कोल्हापूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) राज्यातील ग्रामीण भागातील एक लाख किलोमीटर लांबीचे पाणंद रस्ते व इतर खडीकरणाचे रस्ते निर्मितीचा संकल्प केल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. त्याचबरोबर हर घर गोठे-घर घर गोठे हा उपक्रमही राबविण्यात येणार असून मनरेगांतर्गत बंधनकारक असलेले कुशल, अकुशल कामावरील खर्चाचे प्रमाण यामधून राखले जाणार आहे.मंत्री मुश्रीफ म्हणाले, पुणे जिल्हा परिषदेने हरघर गोठे-घरघर गोठे उपक्रम यशस्विपणे राबविला असून कोल्हापूर जिल्हा परिषदेने पाणंद रस्ते निर्मिती व रस्ते खडीकरण करणे प्रस्तावित केले आहे. या उपक्रमातून शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक मत्तेचे निर्माण करण्याबरोबर रोजगारनिर्मिती होणार आहे.
हरघर गोठे - घरघर गोठे या उपक्रमांतर्गत गाय म्हैस यांचेसाठी गोठ्यात पक्के तळ, गव्हाण आणि मूत्रसंचय टाकी बांधणे, बचतगटांच्या जनावरांसाठी सामूहिक गोठे बांधणे, कुक्कुटपालन शेड (निवारा) बांधणे, शेळी पालन शेड निवारा आदी मत्तेची निर्मिती करण्यात येत आहे. या कामामध्ये केंद्र सरकारच्या निकषांप्रमाणे कुशल-अकुशल प्रमाण योग्य राखण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याने गोठ्याच्या कामाबरोबरच बांधावर किंवा क्षेत्रावर कमीत कमी २० ते ५० फळझाडांचे किंवा वृक्षलागवडीचे मनरेगाअंतर्गत अतिरिक्त काम करणे बंधनकारक आहे.
पाणंद रस्ते, मृद व जलसंधारण, गाळमुक्त धरणांची कामे, घरोघरी शोषखड्डे व घरकुल बांधणे आदी कामेसुद्धा या योजनेंतर्गत घेता येतात. पुणे व कोल्हापूर जिल्हा परिषदांप्रमाणे इतर जिल्हा परिषदांनीही आपआपले नावीन्यपूर्ण उपक्रम प्रस्तावित करावे, अशी सूचनाही मंत्री मुश्रीफ यांनी केली. सद्य:स्थितीत सुरू असलेल्या कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर ही योजना अधिक प्रभावीपणे राबवून रोजगारनिर्मिती करणे त्याचबरोबर शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्यात येतील, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.