लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : उद्योगांना लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिलाचे समान हप्ते करून देण्याची योजना राबविली होती. त्याची मुदत संपल्याने योजनेस १ वर्षाची मुदवाढ द्यावी, अशा मागणीचे निवेदन आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले. यावेळी दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी व संचालक नारायण दुरूगडे उपस्थित होते.
निवेदनात, गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन केल्याने सर्व उद्योगधंदे बंद होते. त्यामुळे उद्योजकांना मार्च २०२० पासूनची वीज बिले भरण्यास अडचणी येत असल्याने थकीत वीज बिलाचे समान हप्ते करून देण्याची योजना राबविली होती. त्याची मुदत ३१ मार्च २०२१ रोजी संपली आहे. राज्यात पुन्हा कोरोनाच्या दुस-या लाटेचे संकट उद्भवले असून उद्योजकांचे सर्व प्रकारचे पेमेंट मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे हप्ते मंजुरीनंतर त्वरित डाऊन पेमेंट ३० टक्के भरावे लागते. परंतु एवढी रक्कम एकदम भरणे ग्राहकांना शक्य नसल्याने डाऊन पेमेंट १० टक्के करावे व उर्वरित रकमेसाठी १२ हप्ते करावे. तसेच अनेक उद्योजक ३० टक्के डाऊन पेमेंट पूर्णपणे किंवा पुढील हप्ते भरू न शकलेल्या सर्व ग्राहकांना १० टक्के डाऊन पेमेंटसह सुधारित योजनेत सहभागी करून घेण्यात यावे, असे म्हटले आहे.