गडहिंग्लज : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी गडहिंग्लज नगरपालिका प्रशासनाने गुरुवार (२९) पासून १० दिवस जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून नगरपालिका व उपजिल्हा रुग्णालयामार्फत शहरातील सुपर स्प्रेडर व विनाकारण फिरणाऱ्यांची कोविड तपासणीची मोहीम सुरू केली आहे. त्यात सरासरी १० ते १२ टक्के नागरिक बाधित झाल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, दुपारी विविध व्यापारी संघटनांचे प्रमुख व पालिकेचे पदाधिकारी यांच्या तातडीच्या संयुक्त बैठकीत झालेल्या चर्चेअंती हा निर्णय घेण्यात आला.
जनता कर्फ्यूच्या काळात औषध दुकाने व दूध संस्था वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांना अन्य कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडता येणार नाही.
कोविड रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक असून, गडहिंग्लज शहरात एकही ऑक्सिजन बेड शिल्लक नाहीत, त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन कोरी यांनी केले आहे.