कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या कहरामुळे राज्य शासनाने जाहीर दोन दिवसांचा लाॅकडाऊन पुकारला होता. या कालावधीत कोल्हापूरच्या सार्वजनिक वाहतुकीचे अंग असणारी केएमटीच्या बस वाहतुकीला मोठा फटका बसला. सलग दुसऱ्या दिवशी रविवारी ३२ बसेस रस्त्यावर असूनही केवळ एक हजारांची कमाई झाली. तर शनिवारी (दि. ११) चे ८७२ रुपये असे दोन दिवसांत १,८७२ रुपयांची कमाई झाली. ही कमाई इंधन खर्चही भागवू शकली नाही.
गेल्या दोन दिवसांपासून शहराची वाहिनी असणाऱ्या केएमटी बसेस केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, शिरोली व पंचतारांकित वसाहतीमध्ये काम करणाऱ्या कामगार आणि रुग्णांकरिता सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. यात एकूण ३२ बसेस शहराच्या विविध नियंत्रण कक्षांसमोर चालक व वाहकांसह सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. यात ७ बसेस महापालिकेच्या विविध दवाखान्यांमध्ये डाॅक्टर, परिचारिका व साधनसामग्री पोहोच करण्यासाठी देण्यात आल्या आहेत. तर उर्वरित बसेसमध्ये शिवाजी चौकात (४), शाहू मैदान (६), गंगावेश (५), महाराणा प्रताप चौक (४), मध्यवर्ती बसस्थानक (४) आणि शिरोली व कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीकरिता प्रत्येकी एक बसची सोय करण्यात आली आहे. यात केवळ रविवारी सकाळी शिरोली व कागल औद्योगिक वसाहतीत जाण्याकरिता या बसेस सोडण्यात आल्या. केएमटीला नियमित दिवसाला या सेवेतून पाच लाखांचे उत्पन्न मिळते. मात्र, लाॅकडाऊनमुळे प्रवाशांची संख्याच घटली. त्यामुळे दोन दिवसात १,८७२ रुपयेच उत्पन्न केएमटीला मिळाले. ३२ बसेसच्या इंधनाचाही खर्च लाॅकडाऊनमुळे निघाला नाही. केवळ अत्यावश्यक सेवा म्हणून ही सेवा केएमटीने गरजूंकरिता सज्ज ठेवली होती, अशी माहिती केएमटी प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.