कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिविभागांमार्फत स्वावलंबी तत्त्वावर काही पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू आहेत. या अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क हे विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयामधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना १० टक्के माफ करण्यास विद्यापीठाच्या प्रशासनाने मान्यता दिली आहे.
ही सवलत विद्यापीठ परिसर, परिक्षेत्रातील महाविद्यालय, विविध अधिविभाग, कार्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना लागू राहणार आहे. अभ्यासक्रमाच्या वार्षिक शैक्षणिक शुल्कापैकी दहा टक्के शुल्क माफ करण्यात येईल. ही सवलत मिळणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यास नियमाप्रमाणे इतर शुल्क लागू राहणार आहे.
ज्या विद्यार्थी अथवा विद्यार्थिनीने विद्यापीठातील स्वावलंबी अभ्यासक्रमास प्रवेश घेताना इतर कोणत्याही शासकीय योजनांचा शुल्कातील सवलतीसाठी लाभ घेतला असल्यास त्यास १० टक्के शुल्कमाफीची सवलत मिळणार नाही, अशी माहिती कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिली.