कोल्हापूर : केंद्र सरकारने शहरासाठी तब्बल १०० वातानुकूलित इलेक्ट्रिक बस मंजूर केल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, मी शब्द दिल्याप्रमाणे पाठपुरावा करत राहिलो. त्याला यश आल्याचे समाधान आहे. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, सत्यजित कदम, जयंत पाटील, राहुल चिकोडे उपस्थित होते. दोन महिन्यांत के.एम.टी.च्या ताफ्यामध्ये या बस सामील होणार आहेत.केंद्र सरकारच्या विशेष समितीकडून पीएम ई-बस सेवा प्रकल्प सुरू झाला असून महाडिक यांनी या प्रकल्पातून कोल्हापूर महापालिकेला बस मिळाव्यात, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. याबाबतची उच्चाधिकारी समितीची बैठक ३० ऑक्टोबरला मुंबईत ऑनलाइन पद्धतीने झाली. देशासाठी ३ हजार १६२, तर महाराष्ट्रासाठी १ हजार २९० बस मंजूर झाल्या. यामध्ये लोकसंख्येच्या निकषानुसार कोल्हापूरसाठी ५० बस मंजूर झाल्या. परंतू, महाडिक यांनी १०० गाड्यांसाठी आग्रह धरला. त्यासाठी आवश्यक त्या सर्वांच्या भेटी घेतल्या आणि त्यामुळेच कोल्हापूरला मंजूर संख्येपेक्षा दुप्पट म्हणजे १०० ई-बस मंजूर झाल्या आहेत. तसा आदेशही केंद्र सरकारने काढला आहे.
के.एम.टी.च्या ताफ्यातील १२९ पैकी ४१ बस मुदतबाह्य किंवा स्क्रॅप झाल्या. सध्या त्यांच्याकडे ९९ बस असून, त्यापैकी ७० बस रस्त्यावर धावत आहेत. एक लाख लोकसंख्येमागे ४० बस असाव्यात असा निकष असून त्यानुसार केएमटीकडे १६० बस असणे आवश्यक आहेत. परंतु, त्याचा दैनंदिन देखभाल खर्च महापालिकेला परवडणारा नाही. हा विभागच अडचणीत असताना महाडिक यांच्या प्रयत्नातून परिवहन विभागाला मोठे गिफ्टच मिळाले आहे.
दहा वर्षे देखभाल खर्च नाहीया सर्व बसची देखभाल करण्यासारखी कोल्हापूर महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे सर्वांत दिलासादायक बाब म्हणजे या बस आल्यापासून दहा वर्षे देखभाल खर्च करावा लागणार नाही. ही मोठी जमेची बाजू आहे.
रस्त्यांसाठी आणखी ९० कोटीशहरातील रस्त्यांसाठी आधी १०० कोटी रुपये आले आहेत. आणखी ९० कोटी रुपये येणार असून या चकाचक रस्त्यांवरूनच या नव्या बस धावणार असल्याचे महाडिक यांनी सांगितले.