रमेश पाटील - कसबा बावडादिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याभरात भारतीय रिझर्व्ह बँकेने कोल्हापुरातील ट्रेझरी असलेल्या चार बँकांच्या शाखांना एक अब्ज रुपयांच्या फ्रेश नोटा वितरित केल्या आहेत. बँकांनीही त्या फ्रेश नोटांची बंडले आपल्या मर्जीतील खास ग्राहकांना देऊन खूश केले आहे. दिवाळी तोंडावर आली की, बँकांतून रक्कम काढण्याचे प्रमाण वाढते. पगार, बोनस, भिशी यासाठी तर मोठमोठ्या कंपन्या एकाचवेळी ५० लाखांपासून ते अगदी कोटीपर्यंत विविध बँकातून रक्कम काढतात. त्यामुळे बँकांना नेहमीच आपल्याजवळ नियमापेक्षा जास्त रक्कम शिल्लक ठेवावी लागते. मोठी रक्कम काढताना बहुतेक ग्राहक बँकांच्या कॅशिअरकडे नवीन नोटांची मागणी करतात. त्यामुळे रिझर्व्ह बँकही दिवाळीला फ्रेश नोटांचे बँकांना वितरण करते.कोल्हापुरातील स्टेट बँक, बँक आॅफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि ट्रेझरी यांना थेट रिझर्व्ह बँकेकडून नवीन नोटा येतात. या तीन बँकांकडून शहरातील अन्य काही राष्ट्रीयीकृत बँकांना तसेच इतर बँकांना मागणीनुसार नोटांचा पुरवठा केला जातो. खासगी बँका त्यांच्या मुख्यालयाकडून खास दिवाळीसाठी नवीन नोटांची मागणी करतात. दरम्यान, महिन्यापूर्वी आलेल्या फ्रेश नोटा आता दिवाळी सणापूर्वीच संपल्या आहेत. बँकांच्या कॅशिअरकडे नवीन नोटांचा तगादा तर ग्राहकांकडून कायम आहे. नवीन नोटांची वाढती मागणी आणि रिझर्व्ह बँकेकडून पाठविण्यात येणाऱ्या नवीन नोटांची संख्या यांचा मेळ बसत नसल्याने कॅशिअरची डोकेदुखी वाढली आहे. ५०० ते १००० रुपयांच्या नवीन नोटा बंडलांना मात्र फारशी मागणी नाही. नवीन नोटांचे आकर्षण कायमनवीन नोटांचे आकर्षण आजही कायम आहे. बँकातून नवीन नोटांचे बंडल जर मिळाले तर पैसे लगेचच खर्च करण्यापेक्षा किमान काही दिवस तरी ते जपून ठेवण्याचा कल काहीसा असतो.दिवाळी सण तोंडावर आला की, बँकांत बहुतेक ग्राहक नवीन नोट बंडलाची मागणी करतात. रिझर्व्ह बँकेकडून महिन्यापूर्वी सुमारे शंभर कोटी रुपये ट्रेझरींना आले होते. या सर्व पैशाचे वितरण बँकांनी ग्राहकांना केले आहे. आता बँकांत नवीन नोटांची बंडले शिल्लक असतीलच असे नाही. त्यामुळे काही ग्राहकांची निराशा होऊ शकते. त्याला नाईलाज आहे. - भास्कर कांबळे, करन्सी चेस्ट अधिकारी, बँक आॅफ इंडिया
कोल्हापूरकरांसाठी १00 कोटींच्या नव्या करकरीत नोटा
By admin | Published: November 04, 2015 10:09 PM