बेळगाव : केंद्र सरकारने जागतिक मानकांची पूर्तता करण्यासाठी प्रसिद्ध पर्यटनस्थळे विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करताना देशातील २३ राज्यांमधील ४० प्रकल्पांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष साहाय्य (एसएएससीआय) योजनेंतर्गत मान्यता दिली आहे. केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी ही घोषणा केली.केंद्रीय अर्थ मंत्रालयाने या आठवड्याच्या सुरुवातीला हिरवा कंदील दिला होता आणि प्रकल्पांना चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने क्रियात्मक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. कमी ज्ञात पर्यटनस्थळांच्या विकासाला प्रोत्साहन देताना या स्थळांच्या आंतरराष्ट्रीय ब्रँडिंग आणि विपणनावर या योजनेद्वारे भर देण्यात येणार आहे.निवडलेल्या प्रकल्पांमध्ये बेळगाव (कर्नाटक) येथील सौंदत्ती यल्लम्मा मंदिर व डोंगर, ताटागुनी (बंगळुरू) येथील रोरीच आणि देविका राणी इस्टेट, बटेश्वर (उत्तर प्रदेश), पोंडा (गोवा), गांडीकोटा (आंध्र प्रदेश) आणि पोरबंदर (गुजरात) यांचा समावेश आहे. प्रादेशिक सल्लामसलत आणि राज्य सरकारांनी तपशीलवार प्रस्ताव सादर केल्यानंतर या स्थळांची निवड करण्यात आली आहे.सौंदत्ती यल्लम्मा डोंगर हे कर्नाटकातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र असून एसएएससीआय योजनेअंतर्गत या तीर्थक्षेत्राचा सर्वसमावेशक विकास केला जाईल. या प्रकल्पात भाविकांच्या सोयीसाठीच्या आधुनिक पायाभूत सुविधांचा समावेश आहे. बेळगावचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी १०० कोटी रुपयांच्या अनुदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सौंदत्ती यल्लम्मा डोंगर विकासासाठी केंद्राकडून १०० कोटी मंजूर, केंद्रीय मंत्री शेखावत यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 4:21 PM