कोल्हापूर : राज्यस्तर सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेमधून शहरात करण्यात येत असलेल्या शंभर कोटींच्या रस्त्यांची कामे दर्जेदार होत नसल्याने तसेच कामात कमालीचा संथपणा आल्यामुळे प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी आक्रमक भूमिका घेत सोमवारी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना पाच हजार रुपये, तत्कालीन शहर अभियंता हर्षजित घाटगे यांना चार हजार रुपये, कनिष्ठ अभियंता निवास पोवार यांना साडेतीन हजार रुपयांचा दंड केला.रस्त्यांच्या कामास जबाबदार धरत ठेकेदार एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर ॲण्ड डेव्हलपर्स यांना दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे. तसेच सल्लागार संदीप गुरव ॲन्ड असोसिएट्स यांनाही सल्लागार म्हणून केलेली नियुक्ती रद्द का करू नये, अशा आशयाची नोटीस बजावली आहे. प्रशासक मंजुलक्ष्मी यांच्या या आक्रमक कारवाईमुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे.प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी दि. १८ नोव्हेंबर रोजी सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेमधून सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, ठेकेदार एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर ॲन्ड डेव्हलपर्स प्रतिनिधी, प्रकल्प सल्लागार संदीप गुरव ॲन्ड असोसिएट्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.ठेकेदार एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर ॲन्ड डेव्हलपर्सने निविदेतील शर्ती व अटीनुसार आवश्यक बाबींची, जसे साईट लॅब सुरू करणे, साईट ऑफिस सुरू करणे व इतर बाबींची पूर्तता केली नाही. बारचाट दिला नाही, डांबरीकरण करताना सेन्सर पेव्हरचा वापर केला नसल्याचे आढळून आले होते. प्रशासकांनी पाहणी करताना कामाच्या जागेवर पंचनामा करून त्या ठिकाणचे सॅम्पल घेऊन ते मटेरियलचे सॅम्पल गव्हर्मेंट पॉलिटेक्निकल कॉलेजला टेस्टिंगला पाठविण्याचे आदेश प्रशासकांनी दिले. या टेस्टिंगमध्ये गुणवत्तेपेक्षा कमी प्रमाणात डांबराची क्वांटीटी आढळून आल्याने त्यांना निविदेतील अटी व शर्तींच्या अधिन राहून दंडात्मक कारवाई करण्यात नोटीस दिली आहे.त्याचबरोबर सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेवरील प्रकल्प सल्लागार संदीप गुरव ॲन्ड असोसिएट्स यांनी दसरा चौक ते नंगीवली चौक या रस्त्याच्या कामावर ठेकेदारामार्फत गेल्या ११ महिन्यांच्या कालावधीमध्ये ६० टक्के काम पूर्ण करून घेतले नसल्याने व बारचाट तयार केला नसल्याने सल्लागार कंपनीला या कामावरून कमी का करण्यात येऊ नये याबाबत नोटीस बजावली आहे.कामात कुचराई केल्याचा ठपका..सोळा रस्त्यांची कामे विहित मुदतीत, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करून घेणे, कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी शहर अभियंता सरनोबत यांची आहे. सल्लागार कंपनी व ठेकेदारांशी समन्वय ठेवून सर्व बाबींची पूर्तता करून घेणे गरजेचे होते. ही कामे झाली नसल्याने सरनोबत यांना पाच हजार रुपये व तत्कालीन शहर अभियंता तथा जल अभियंता हर्षजित घाटगे यांना चार हजार रुपये तर कनिष्ठ अभियंता निवास पोवार यांना दसरा चौक ते नंगीवली चौक रस्त्यावर प्रशासक फिरती करताना साईटवर उपस्थित नसल्याने त्यांनाही साडेतीन हजार दंड केला.
कोल्हापुरातील शंभर कोटींच्या रस्त्यांचा दर्जा सुमार; तीन अधिकाऱ्यांना दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 11:46 AM