कोल्हापूर : घरगुती गॅस सिलिंडर ग्राहकांना कंपन्यांनी चालू महिन्यात १५ दिवसांच्या अंतराने शंभरचा करंट दिला आहे. एकाच महिन्यात १०० रुपयांनी गॅस महागल्याने किचन बजेटवर ताण पडला आहे. त्यातच खात्यावर येणारे अनुदानही बंद असल्याने कोल्हापुरात आता १४.२ किलोंच्या सिलिंडर्ससाठी ७०७ ते ७२१ रुपये मोजावे लागणार आहेत.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून मंगळवारी हे दर जाहीर केले आहेत. दर १५ दिवसांनी हे दर जाहीर होतात. या महिन्याच्या एक तारखेला ५० रुपये वाढ झाली होती, १५ दिवसांच्या अंतरात आणखी ५० रुपये वाढवले गेले आहेत. एकूण वाढ १०० रुपये झाली आहे.
जुलैनंतर पहिल्यांदाच गॅसच्या दरात वाढ झाली आहे. मागील वाढ जूनमध्ये झाली होती. त्यानंतर नोव्हेंबरअखेरपर्यंत एक रुपयाचीदेखील वाढ झालेली नव्हती. पाच महिन्यांच्या विरामानंतर दोन टप्प्यात १०० रुपयांची मोठी वाढ झाली आहे.
एप्रिलमध्ये सर्वाधिक ७२९ दर होता, त्यात मेमध्ये १३८ रुपयांची कपात होऊन ते ५९१ वर आले. त्यानंतर जूनमध्ये १० रुपयांची वाढ झाली. जुलैमध्ये किरकोळ चार रुपयांची वाढ होऊन तो दर ६०६ रुपये झाला. १ डिसेंबरला ५० रुपयांची वाढ होऊन हा दर ६५७ वर गेला. मंगळवारी आणखी ५० रुपयांची त्यात भर पडल्याने ही वाढ ७०७ वर पोहेचली आहे. वाहतूक व इतर खर्चासह प्रती सिलिंडरची किंमत ७२१ वर जाणार आहे.
चौकट ०१
अनुदानावरून संभ्रम
गॅस अनुदान थेट खात्यात जमा होत होते; पण मे महिन्यापासून ते येणे बंदच झाले आहे. सिलिंडरचा दर ६०० रुपयांपर्यंत खाली आल्याने हा निर्णय घेतला असल्याचे सरकार व कंपनीकडून सांगण्यात येत होते; पण आता दर पुन्हा वाढल्यानंतरही गेल्या १५ दिवसांत याबाबत कोणताच आदेश आलेला नाही. सरकारकडूनच आदेश नसल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. अनुदानाअभावी ग्राहकांना वाढीव दराने गॅसची झळ सोसावी लागत आहे.