पोपट पवार कोल्हापूर : सामाजिक न्याय विभागाच्या ‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’ या संस्थांमार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, अधिछात्रवृत्ती यामध्ये समानता आणण्यासाठी सरकारने समान धोरण निश्चित केले खरे; मात्र बार्टी संशोधक विद्यार्थ्यांना १०० टक्के फेलोशिप मंजूर करीत सरकारने समान धोरण कागदावरच असल्याचा प्रत्यय दिला आहे. ‘बार्टी’ला पूर्ण फेलोशिप मग ‘सारथी’ व ‘महाज्योती’ला अर्धी का? असा सवाल करत हे विद्यार्थी आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी) व महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या संस्थांमार्फत संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्यात येते. त्यानुसार आलेल्या जाहिरातींनुसार अर्जामधील कागदपत्रांची पडताळणी करून व शपथपत्र घेऊन एकूण ३५४५ संशोधक विद्यार्थ्यांपैकी पात्र संशोधक विद्यार्थ्यांना ५० टक्के दराने सरसकट अधिछात्रवृत्ती मंजूर केली होती; मात्र आम्हाला शंभर टक्के दराने अधिछात्रवृत्ती द्या, अशी मागणी करत ‘बार्टी’तील संशोधक विद्यार्थ्यांनी गेले १५ दिवस आंदोलन केले.कागदपत्र पडताळणीवर बहिष्कार टाकत आत्मदहन करण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतर २५ ऑगस्टच्या मंत्रिमंडळ बैठकीत बार्टी संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट शंभर टक्के दराने फेलोशिप मंजूर केली. ‘बार्टी’सह ‘सारथी’ व ‘महाज्योती’मधील विद्यार्थ्यांचीही शंभर टक्के दराने फेलोशिप देण्याची मागणी असताना केवळ ‘बार्टी’चीच मागणी मान्य केल्याने ‘सारथी’ व ‘महाज्योती’चे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. सरकार विद्यार्थ्यांमध्येही दुजाभाव करत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
समान धोरण अमलात आणा‘सारथी’ आणि ‘महाज्यो’तीमधील पीएच.डी.च्या संशोधक विद्यार्थ्यांना ५० टक्केच शिष्यवृत्ती मिळणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. सरकारने समान धोरण अमलात आणून सर्वांनाच सरसकट १०० टक्के शिष्यवृत्ती द्यावी, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांना शंभर टक्के दराने फेलोशिप दिल्याबद्दल सरकारचे आभार; पण सरकारने विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव न करता गेले दीड वर्ष ज्या समान धोरणाची सरकार वल्गना करत होते तेच अमलात आणावे व ‘सारथी’ आणि ‘महाज्योती’मधील संशोधक विद्यार्थ्यांनाही १०० टक्के फेलोशिप द्यावी. - संभाजी खोत, अध्यक्ष सारथी कृती समिती.
पीएच.डी.ला प्रवेश घेतल्यापासून लढावे लागत आहे. आता पुन्हा तिन्ही संस्थेतल्या भेदभाव करणाऱ्या निर्णयासाठी पुन्हा लढावे लागते. संशोधन करायचं की फक्त लढायचं हेच समजेना. - आयेशा आतार, संशोधक विद्यार्थिनी, महाज्योती.
‘बार्टी’बाबत घेतलेल्या निर्णयाचे स्वागत; पण ‘महाज्योती’ संस्थेतही २०२२ या वर्षातील अर्जदारांची संख्या मोठी आहे. याचा विचार का केला नाही. सर्व पात्र विद्यार्थ्यांना पूर्ण व नोंदणी दिनांकपासून अधिछात्रवृत्ती द्यावी, अन्यथा १ सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू करू. - सद्दाम मुजावर, अध्यक्ष, महाज्योती कृती समिती.