हातकणंगले : हातकणंगले तालुक्यामध्ये खरिपाच्या पेरण्या १५ जून पूर्वीच शंभर टक्के पूर्ण झाल्या असून, मका आणि खरीप ज्वारीचा शेतकरी यावर्षी भुईमूग पिकाकडे वळल्यामुळे यावर्षी ८९० हेक्टर क्षेत्रावर जादा भुईमूग पेरण्या झाल्या आहेत. वळीव पावसामुळे ऊस पिके जोमात आहेत तर खरिपाचा पेरा साधल्याने पिके बहरली आहेत.
चालू वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे मृग नक्षत्रामध्येच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. जून महिन्यात १७७ टक्के तर, जुलैमध्ये आता पर्यंत सरासरी १७४ टक्के पाऊस झाला आहे. चालू खरीप हंगामात १०० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यावर्षी कृषी विभागाने खरीप ज्वारीचे ९५० हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट धरले होते त्यांची प्रत्यक्ष पेरणी २६९ हेक्टर झाली आहे. तर मका पिकाचे ४५० इतके उद्दिष्ट असताना फक्त २६ हेक्टर मका पेरणी झाली आहे. मका आणि खरीप ज्वारीचा शेतकरी भुईमुगाकडे आकर्षित झाल्यामुळे भुईमुगाचे ८९३ हेक्टर क्षेत्र वाढल्याने शेतकऱ्यांचा कल भुईमुगाकडे दिसून आला आहे. तसेच सोयाबीनची पेरणी ही या हंगामा मध्ये उद्दिष्टापेक्षा ३५० हेक्टरने वाढली आहे. पंचगंगा आणि वारणा नदी पट्यामध्ये ऊसक्षेत्र मध्येही वाढ झाली आहे.
चौकट -
दृष्टिक्षेपात हातकणंगले तालुका
कृषी विभागाचे उद्दिष्ट आणि कंसात पेरणी झालेले क्षेत्र.
तालुक्याचे पेरणी योग्य क्षेत्र - ४४८३० हेक्टर
भात - ७४० (१०४५ ) हेक्टर, मका - ४५० (२६), खरीप ज्वारी ९५० (२६९ ), मूग -उडीद कडधान्ये ११९० (८०७), भुईमूग ८७०० (९६९३ ), सोयाबीन १०५१२ (१०८६७), ऊस २३८५२.
प्रधानमंत्री पीकविमा योजनेला तालुक्यातील ६२ पैकी ३७ गावांतील २३३ शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. यामध्ये वारणा पट्टयातील गावाचा समावेश आहे. किणी आणि घुणकीचे प्रत्येकी ३० शेतकरी आहेत. इतर गावांतून हाताच्या बोटावर मोजण्याइतपत शेतकरी सहभाग आहे. पीकविम्याला अल्प प्रतिसाद आहे.
पीकनिहाय विमा उतरविणारे शेतकरी याप्रमाणे सोयाबीन = १४०, भुईमूग= ७२, भात =२० आणि ज्वारी = १ असे २३३ शेतकरी विमा लाभार्थी आहेत. तालुक्यातील २३ गावातील शेतकऱ्यांनी पीकविमाच उतरलेला नाही. कृषी विभागाकडून शेतीशाळा अंतर्गत पीकविम्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.