कोल्हापूर : पुणेशिक्षक मतदारसंघातील मतदार यादीत सुमारे १० हजार बोगस मते नोंदविली गेल्याचे उघड झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले होते. त्यामुळे पदवीधर असणाऱ्यांची नावे शिक्षक मतदारसंघात आली आहेत. पुणे जिल्ह्यातील बहुतांश नावे असून, याबाबत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.पुणे शिक्षक मतदारसंघासाठी गेले वर्षभर नोंदणी सुरू होती. शिक्षक ज्या शाळेत सेवेत आहेत, तेथील मुख्याध्यापकांच्या सही, शिक्कांचा सभासद नोंदणी फॉर्म भरणे बंधनकारक होते. मात्र, मार्चनंतर कोरोनामुळे सगळी यंत्रणा थांबली होती. कोरोनाचे संकट गेल्यानंतर निवडणूक होईल, असा अंदाज होता. मात्र, आयोगाने निवडणुकीच्या हालचाली सुरू केल्याने ऑनलाईन मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले.
एकाच वेळी पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाल्याने पदवीधरांनी माहिती भरताना चुकीची भरली आहे. ऑनलाईन नोंदणीपूर्वी ५६ हजार मतदार नोंदणी होती. मात्र, आता ती ७२ हजार दिसत असल्याने तिची पडताळणी करण्यात आली. यादीतील लोकांना फोन करून खात्री केली असता, आपण शिक्षक नसल्याचे त्यांनी सांगितले.
ऑनलाईन नोंदणीनंतर अचानक १६ हजार नवीन नोंदणी झाली. याबाबत खातरजमा केल्यानंतर शिक्षक नसणाऱ्यांचा समावेश आढळला. सुमारे १० हजार बोगस नावे असल्याबाबत तक्रार केली आहे.- संजय पाटील, निवडणूक प्रतिनिधी, महाविकास आघाडी