दहावी-बारावीचे ऑनलाईन वर्ग जूनपासून सुरू झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पहिल्यांदा ऑफलाईन पद्धतीने नोव्हेंबरमध्ये दहावीचे वर्ग सुरू झाले. त्यानंतर जानेवारीमध्ये बारावीच्या वर्गांचा प्रारंभ झाला. ५० टक्के उपस्थितीच्या नियमांचे पालन करून सध्या वर्ग भरत आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपांत या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहे. गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे परीक्षांच्या स्वरूपाबाबत पालकांमध्ये संभ्रमावस्था होती. शिक्षण मंडळाने गेल्या दोन आठवड्यांपूर्वी ऑफलाईनचा निर्णय जाहीर केल्याने पालकांचा संभ्रम दूर झाला. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने पाल्यांच्या सुरक्षेबाबतची धाकधूक पालकांमध्ये निर्माण झाली आहे.
चौकट
अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे वेध
ऑनलाईन वर्गांना सर्वच विद्यार्थी उपस्थित राहत नव्हते. त्यामुळे ऑफलाईन वर्गांचा प्रारंभ झाल्यापासून पहिल्यापासून अभ्यासक्रम शिकविणे शाळा, महाविद्यालयांनी सुरू केले. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे वेध विद्यार्थी, शिक्षकांना लागले आहेत. पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमांवर दर आठवड्याला सराव परीक्षा घेण्यात येत आहेत.
दहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते?
ऑफलाईन परीक्षेचा निर्णय जाहीर करून बोर्डाने संभ्रम दूर केला; पण, कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. त्याबाबतची स्थिती लक्षात घेऊन परीक्षेच्या स्वरूपाबाबत शासनाने फेरविचार करावा.
- पूनम मोहिते, कसबा बावडा.
दहावीचे वर्ष महत्त्वाचे असल्याने परीक्षा या दरवर्षीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात. परीक्षेदरम्यान शाळांनी कोरोनाबाबतच्या दक्षतेच्या सर्व उपाययोजना करून पालकांना दिलासा द्यावा.
- श्रीकांत देसाई, टाकाळा.
आधी ऑनलाईन, आता ऑफलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा भार आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत दक्षता घेऊ ऑफलाईन परीक्षा घेण्यास हरकत नाही.
- अस्लम अत्तार, शाहुपुरी.
बारावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते?
विद्यार्थ्यांच्या करिअरचा विचार करता परीक्षा वेळेत होणे आवश्यक आहे. योग्य त्या स्वरूपात काळजी घेऊन ऑफलाईन पद्धतीने शासनाने परीक्षा घेतल्यास बरे होईल.
-संदीप उन्हाळे, शिरोली पुलाची.
ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा आहेत. त्या परीक्षा देतानाही जाणवू शकतात. त्यामुळे परीक्षा ऑफलाईन पद्धतीने पण, कोरोनाबाबतच्या नियमांचे कडक अंमलबजावणी करून घेण्यात याव्यात.
- मंदाकिनी साळोखे, न्यू शाहुपुरी.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंता वाटत आहे. प्रादुर्भाव वाढल्यास ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणे योग्य ठरणार आहे. परीक्षेपर्यंत प्रादुर्भाव कमी झाल्यास दरवर्षीप्रमाणे ऑफलाईन परीक्षा घ्यावी.
- गजानन माळी, साठमारी, मंगळवार पेठ.
परीक्षेचे वेळापत्रक
दहावीची परीक्षा : २९ एप्रिल ते २० मे
बारावीची परीक्षा : २३ एप्रिल ते २१ मे
विद्यार्थी संख्या
दहावी : १,८४,४५९
बारावी :१,२१,१५९
फोटो (२४०२२०२१-कोल- कॉलेज परीक्षा डमी)