कोल्हापूर : अचानक वीज गेली, भारनियमन झाल्यानंतर मेणबत्तीच्या प्रकाशात, अंधाऱ्या वातावरणात यंदा दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा केंद्रांना जनरेटर अथवा इन्व्हर्टरची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार कोल्हापूर विभागातील ४१७ परीक्षा केंद्रे या दृष्टीने सज्ज झाली आहेत.पेपर सुरू असताना अचानकपणे वीज गेल्यास, भारनियमन झाल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होतो. एक प्रकारे अस्वस्थता निर्माण झाल्याने त्यांना पेपर सोडविणे त्रासदायक होते. असे काही प्रकार यापूर्वी घडले होते. त्याबाबत एक जनहित याचिका दाखल झाली होती. त्यावर फेब्रुवारी-मार्च २०१५ मध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेच्या कालावधीत सर्व परीक्षा केंद्रांवर वीजपुरवठ्याला पर्यायी व्यवस्था करण्याचे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षण मंडळाला दिले आहेत. त्यानुसार शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय सचिवांनी विभागातील परीक्षा केंद्रांना वीजपुरवठ्याला पर्याय म्हणून जनरेटर अथवा इन्व्हर्टरची व्यवस्था करावी अशा सूचना २० नोव्हेंबर २०१४ रोजी पत्राद्वारे दिल्या. त्यावर दोन ते तीन दिवसांत परीक्षा केंद्र असलेल्या शाळा, महाविद्यालयांतील मुख्याध्यापक, प्राचार्यांनी याबाबतच्या व्यवस्थेची माहिती शिक्षण मंडळाला फॅक्स, ई-मेल, पत्र आणि दूरध्वनीवरून संपर्कसाधून दिली. कोल्हापूर विभागांतर्गत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत दहावी, बारावीची एकूण ४७६ परीक्षा केंद्रे आहेत. त्यांपैकी ४१७ केंद्रांवर वीजपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था उपलब्ध आहे. उर्वरित ५९ केंद्र संचालकांनी परीक्षेच्या कालावधीत ही व्यवस्था पुरविली जाईल, असे कळविले आहे. त्यामुळे कोल्हापूर विभागातून दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमधील ‘अंधार’भय संपणार आहे. (प्रतिनिधी)
दहावी, बारावीतील ‘अंधार’भय संपणार
By admin | Published: December 24, 2014 11:53 PM