कोल्हापूर : मोबाईलवर मटका घेणारे रॅकेट लक्ष्मीपुरी पोलिसांनी उद्ध्वस्त करीत शुक्रवारी आणखी ११ जणांवर कारवाई केली. पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी अटक केलेल्यांच्या मोबाईलच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
अटक केलेल्या संशयितांची नावे अशी, शिवकुमार शशिकांत भोसले (रा. राजारामपुरी तिसरी गल्ली), रजाक ऊर्फ रियाजभाई बाळासाहेब शेख (रा. यादवनगर), राजेंद्र वसंत बुड्डे, अक्षय ऊर्फ आकाश कुशाप्पा कांबळे (दोघे रा. लक्ष्मीपुरी), योगेश शिवाजी नरवाडे (सी वॉर्ड), झाकीरहुसेन अमीरहम्जा बारगीर (बिंदू चौक), रवींद्र भालचंद्र पोतदार (रा. लक्षतीर्थ वसाहत), प्रतीक प्रभाकर साळोखे (रा. पाटपन्हाळा, पन्हाळा), दीपक तानाजी माने (रा. गणेशवाडी, कसबा बीड), प्रशांत मनोहर आग्रे (रा. वाशी, करवीर), सूरज सुनील पोवार (रा. शिवाजी पेठ).पोलिसांनी दिलेली माहिती, जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी कडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुरुवारी (दि. १६) मोबाईलवर मटका घेणाऱ्या नईम शेख व दिलीप तोरस्कर या दोघा संशयितांवर कारवाई केली होती. त्यांच्याकडून जप्त केलेल्या मोबाईलचे कॉल डिटेल्स व व्हॉटस्ॲप संदेशांच्या माध्यमातून यांतील अन्य ११ संशयितांचा पोलिसांनी शोध घेतला. त्यानंतर त्या सर्वांवर अटकेची कारवाई केली. ही मोहीम आणखी तीव्र केली जाणार आहे. यासाठी सायबर पोलीस ठाण्याचीही मदत घेतली जाईल, असे पोलीस निरीक्षक गुजर यांनी सांगितले.