इचलकरंजी : पूरग्रस्तांना दोन दिवसांत शासनाकडून मदत मिळणार असून व्यवसाय, दुकाने, घरांची पडझड, शेतीचे पंचनामेही लवकर पूर्ण करून त्यांनाही मदत दिली जाणार आहे. आयजीएम रुग्णालय इमारत दुरुस्तीस ११ कोटी मंजूर असून या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महापुरामुळे इचलकरंजीतील पूरक्षेत्रातील नागरिकांसह दुकाने, व्यवसाय, औद्योगिक क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना शासनाकडून तातडीने मदतीसाठी प्रयत्न केल्याने नुकसानग्रस्त घरांच्या पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे.
मदतीची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झाली असून दोन दिवसांत ती रक्कम नुकसानग्रस्तांना मिळणार आहे. पंचनाम्यानंतर पुरामुळे पूर्ण पडझड झालेल्या घरांसाठी दीड लाख, ५० टक्क्यांहून अधिक पडझड झालेल्यांसाठी ५० हजार आणि ५० टक्क्यांहून कमी पडझड झालेल्यांना २५ हजार रुपये मिळणार आहेत.
आयजीएम रुग्णालयात अतिरिक्त २ लिक्विड ऑक्सिजन टँक उभारण्याचे काम सुरू असून, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे कामही प्रगतीपथावर आहे. लवकरच या रुग्णालयास ३०० बेडची मान्यता मिळणार आहे. सध्या रुग्णालयात २२ व्हेंटिलेटर कार्यान्वित असून पुणे येथील कंपनीमार्फत आवश्यक प्रशिक्षण दिले जात असल्याने लवकरच सर्व व्हेंटिलेटर उपयोगी ठरतील, असे आमदार आवाडे यांनी सांगितले.
अडचणीतील वस्त्रोद्योगाला उभारीसाठी तत्कालीन राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्णयाची सरकारने अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर पुराची समस्या कायमस्वरूपी निकालात निघावी यासाठी प्रयत्न सुरू असून सर्वच नद्यांतील गाळ व वाळू काढून नदीपात्राची खोली वाढविण्याची गरज आहे. आवश्यक उपाययोजनाही तातडीने करण्यात याव्यात, असेही ते म्हणाले. यावेळी प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, प्रकाश सातपुते, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, सुनील पाटील, दीपक सुर्वे, संजय केंगार, राजू बोंद्रे उपस्थित होते.
चौकट
बैलगाडी घेऊन तहसीलदार कार्यालयावर मोर्चा
बैलगाडी व लाकूड ओढण्याच्या शर्यतीसाठी परवानगी मिळावी, या मागणीसाठी आज, बुधवारी हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये सहभागी होणार असल्याचे आवाडे यांनी सांगितले.