भीमगोंडा देसाई- कोल्हापूर -शिरोळ तालुक्यातील ११ गावांतील पाणी योजनेत कमीत कमी सुमारे अडीच कोटींचा ढपला मारल्याचा आरोप अंकुश संस्थेने केला आहे. संबंधित पाणी योजनेची चौकशी करून कारवाई करावी, यासाठी संस्था पाठपुरावा करत आहे. मात्र, वर्षभर केवळ कागदोपत्री कार्यवाहीचेच नाटक सुरू आहे म्हणून गैरव्यवहारांवर कारवाई व्हावी, यासाठी १५ आॅगस्टपासून शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहे, असे निवेदन सोमवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद प्रशासनास दिले आहे.राष्ट्रीय पेयजल योजनेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत आहेत. गैरव्यवहार स्पष्ट झाल्यानंतर पन्हाळा तालुक्यातील सातवे, गडहिंग्लज तालुक्यातील जांभूळवाडी पाणी योजनेतील दोषींविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे पाणी योजनेतील गैरव्यवहाराच्या विरोधात उघडपणे तक्रारी होत आहेत. कोट्यवधी रुपयांच्या पाणी योजनेवर नियोजनपद्धपणे लाखो रुपयांचा डल्ला मारला आहे. अंकुश संस्थेने शिरोळ तालुक्यातील पाणी योजनेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला आहे. कवठेसार पाणी योजनेतील गैरकारभाराची प्राथमिक चौकशी झाली आहे. त्यामध्ये अंतर्गत पाईपवाहिनीची सँड बॉक्सिंग न करताच खोटी मोजमापे लिहून पैसे काढल्याचे निदर्शस आले आहे परंतु, दोषींवर कारवाई झालेली नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातर्फे दोषींची खातेनिहाय चौकशी सुरू आहे. तेरवाड पाणी योजनेची चौकशी झाली आहे. या योजनेतील काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. पदाचा गैरवापर करून बोगस ग्रामसभा दाखविल्याप्रकरणी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, ग्राम पाणीपुरवठा स्वच्छता समिती, अध्यक्ष, सचिव, सदस्य यांच्यावर फौजदारी दाखल करावी, असा अहवाल चौकशी अधिकाऱ्यांनी दिला आहे. शिरढोण पाणी योजनेत पाईपलाईन टाकवडे गावच्या पाईपलाईनच्या चरीत टाकले आहे. कॉपर डॅम, रिव्हर क्रॉसिंगसारखी कामे न करताच पैसे काढले आहे. टाकवडे पाणी योजनेतही शिरढोण पाणी योजनेत जसा गैरकारभार केला आहे, अशी तक्रार आहे. त्याचप्रमाणे करून ढपला मारला आहे. नृसिंहवाडी पाणी योजनेतील अंतर्गत पाईपलाईनचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. अब्दुललाट पाणी योजनेतही तीन गावाच्या पाईप एकाच चरीतून टाकल्या आहेत. चिपरी योजनेत काम निकृष्ट झाल्यामुळे अंतर्गत पाणीलाईनला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. आलास, गणेशवाडी, शिरदवाड, शिवनाकवाडी योजनेचीही तक्रार झाली आहे. अंकुश संस्थेचे शिष्टमंडळ भेटून निवेदन दिले आहे. त्यांनी तक्रार केलेल्या ११ पैकी ३ पाणी योजनेची चौकशी सुरू आहे. टप्प्या-टप्प्याने सर्वच गावांची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होईल. - अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद शिरोळ तालुक्यातील ११ गावांतील पाणी योजनेत अधिकारी, ठेकेदार यांनी भ्रष्टाचार केला आहे. भ्रष्टाचारात जिल्हा परिषद तत्कालीन कार्यकारी अभियंता, अभियंता कमळे यांचाही सहभाग आहे. आम्ही रितसर तक्रार केली आहे. मात्र, अद्याप कारवाई झालेली नाही. - धनाजी चुडमुंंगे, अध्यक्ष, अंकुश संघटनाकसे लाटले पैसे..निकृष्ट दर्जाचे पाईप, पाईपलाईनसाठी चर काढताना माती असताना कठीण खडक लागले आहे, एकाच चरीतून दोन गावांच्या पाईपलाईन टाकणे, पर्यायी विद्युत पंप न घेणे, प्रत्यक्षात काम न करता कागदोपत्री दाखविणे अशाप्रकारे पैसे काढले आहेत. शिरदवाड पाणी योजनेतीची पाईपलाईन अनावश्यक पैसे काढण्यासाठी कर्नाटकातील बोरगावच्या हद्दीत टाकण्यात आली आहे.
११ गावांतील ‘पाण्यात’ अडीच कोटींचा ढपला
By admin | Published: August 04, 2015 12:44 AM