लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ)ची वार्षिक सर्वसाधारण सभा अवघ्या ४० मिनिटांत आटोपली. विषयपत्रिकेवरील महत्त्वपूर्ण अकरा विषय तर मिनिटात मंजूर झाले. संघाचे नेते महादेवराव महाडिक यांनी हातात अहवाल धरून मंजुरीची आरोळी दिल्यानंतर ‘मंजूर... मंजूर’ म्हणून घोषणा देण्यात आल्या व सभाच गुंडाळण्यात आली.
महाडिक यांची ही हुकुमशाही असून संघाच्या इतिहासात अशी हुकुमशाही कधी पाहिली नसल्याचे सांगत सत्तारूढ गटाने लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप समांतर सभेत विरोधकांनी केला. महाडिक हे संघाचे अध्यक्ष, संचालक किंवा कार्यकारी संचालक नसतानाही त्यांनी कोणत्या अधिकारात सभेच्या थेट कामकाजात भाग घेतला? अशी विचारणा झाली व त्यावरून त्यांच्यावर दिवसभर सोशल मीडियातूनही टीकेची झोड उठली.सकाळी अकरा वाजता महाडिक, पी. एन. पाटील, अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह संचालक व्यासपीठावर आल्यानंतर सभा सुरू झाली. पहिल्या पाच मिनिटांत अध्यक्ष विश्वास पाटील यांनी प्रास्ताविकात संघाच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी अहवाल सालात दिवगंत झालेल्यांना एका वाक्यात श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर ‘गोकुळ श्री’चे सहा विजेते व पाच गुणवंत कर्मचाºयांचा गौरव करण्यात आला. पी. एन. पाटील यांनी मुख्यत: संघाच्या कारभाराविषयीच आपले भाषण मर्यादित ठेवले.
महाडिक यांनी मात्र त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये रामायण-महाभारतातील प्रसंगांचे दाखले देत विरोधकांवर टीका केली. देशातील कोणत्याही ‘सी.ए.’कडून संघाच्या व्यवहाराची चौकशी करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. उगीच टीका करायची म्हणून चांगल्या संघावर टीका करू नका, असा सल्ला त्यांनी दिला. हे दहा मिनिटांचे भाषण संपताच हातात अहवाल धरून ‘विषयपत्रिकेवरील अकरा विषय मंजूर का?’ अशी आरोळी महाडिक यांनी दिली. त्यानंतर लगेचच समर्थकांनी ‘मंजूर... मंजूर’ असे म्हणताच क्षणाचाही विलंब न लागता लगेचच राष्टÑगीत सुरू झाले. सभासदही त्यावेळी काही क्षण गोंधळून गेले.
संस्था प्रतिनिधींनी अहवालावर काही लेखी प्रश्न दिले होते. त्याचबरोबर काहींना थेट प्रश्न उपस्थित करायचे होते; पण सभा गुंडाळल्याने उपस्थित प्रतिनिधींमधून तीव्र नाराजी व्यक्त झाली. त्यानंतर विरोधी गटाचे सभासद आक्रमक झाले. त्यांनी सभामंडपातून बाहेर येताना संरक्षक कठडा म्हणून उभे केलेले पत्रे जोरदार हलविले. त्यांचा आवाज झाल्याने तणाव व गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यावेळी ‘सतेज पाटील यांचा विजय असो,’ ‘सभा गुंडाळणाºयांचा निषेध असो,’ ‘महाडिक यांना सभेत बोलण्याचा अधिकार कुणी दिला?’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. हे सगळे लोक गोंधळात फाटकाच्या बाहेर आले व तिथे दुभाजकावर उभे राहून समांतर सभा घेण्यात आली. त्या सभेत शेकापचे कार्यकर्ते बाबासाहेब देवकर, किरणसिंह पाटील, राऊ पाटील व विश्वास नेजदार यांनी महाडिक यांच्या सहभागावरून टीकेची झोड उठविली. त्यांनी सभेत कोणत्या अधिकाराने सहभाग घेतला? अशी विचारणा त्यांनी केली. आतापर्यंत दिवंगत नेते आनंदराव पाटील-चुयेकर यांनी अनेक सभा हाताळल्या; परंतु इतिहासात असे कधी घडले नाही. समांतर सभेला ‘कुंभी’चे संचालक किशोर पाटील, विलास पाटील तसेच बाळ कुपेकर, विद्याधर गुरबे, बजरंग पाटील, आदी उपस्थित होते. सभा संपल्यावर आभार मानण्याचे सौजन्यही दाखविले नाही.प्रतिनिधी सभामंडपाबाहेरचसत्तारूढ गटाने आपल्या समर्थकांना सकाळी दहा वाजताच सभामंडपात आणून बसविल्याने अनेक संस्था प्रतिनिधींना मंडपात उभा राहायलाही जागा नव्हती. त्यामुळे अनेकांना ताटकळतच मंडपाबाहेरच उभे राहावे लागले.सत्ताधाºयांनी संधी गमावली!संघाच्या कारभारावर विरोधकांकडून ३४ प्रश्न उपस्थित केले होते. त्यांची सविस्तर उत्तरे देऊन सभा चांगली चालविण्याची संधी होती; परंतु तसे न करता सभा गुंडाळल्याने संघावर प्रेम करणाºया सभासदांनीही नाराजी व्यक्त केली.नोटीस वाचनाचा अधिकार सचिवांनासहकार कायद्यानुसार सचिव अथवा कार्यकारी संचालकच सभेचे नोटीस वाचन करतात; पण येथे चक्क महाडिक यांनीच नोटिसीचे वाचन केले. मागील सभेला प्रश्नोत्तरांवरून गोंधळ उडाला होता, त्यावेळी अरुण नरके यांनी सावरले. राजाराम साखर कारखान्याच्या सभेतही महाडिक यांनी अशीच भूमिका घेतली होती. तिची पुनरावृत्ती केल्याची चर्चा येथे होती.सतेज पाटील अनुपस्थितगेल्या सभेत सत्तारूढांना घाम फोडणारे आमदार सतेज पाटील या सभेला परदेशात असल्यामुळे अनुपस्थित राहिले. त्यामुळे सभा कशीबशी पाऊण तासात संपली. चंदगड, गगनबावडा, पन्हाळ्यातील सभासद अजून फाटकावरच आहेत, तोपर्यंत सभा संपवून लोक बाहेर आले. ही सभा सत्तारूढांना चालवायचीच नव्हती; म्हणूनच सकाळी ११ वाजता घेतल्याची टीका केली.‘पी. एन.’ यांच्याकडून नरके यांचे अभिनंदनइंडियन डेअरी असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांचा सत्कार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पी. एन. पाटील यांनी नरके यांना, महाडिक व आपल्यामध्ये येऊन सत्कार स्वीकारण्यास सांगितले; पण महाडिक यांनी ‘पी. एन., तुम्ही आमच्यामध्येच रहा,’ असे सांगितले. सत्कारानंतर नरके यांच्या हातात हात घालून ‘पी. एन.’ यांनी त्यांचे अभिनंदन केले.चुकीचा पायंडा नकोमहाडिक यांना बोलायला देण्याचा नवीन, चुकीचा पायंडा पाडून संचालक मंडळ काय साधत आहे, हेच समजत नाही, अशी टीका हसूर दुमालाचे ज्येष्ठ सभासद श्रीपती पाटील यांनी केली. ‘अमूल’ ८.४ फॅटला ५४.९४ पैसे दर देते आणि ‘गोकुळ’ ४६ रुपये देतो. मग ‘गोकुळ’च भारी असल्याच्या वल्गना संचालकांनी करू नयेत, असाही इशारा यावेळी पाटील यांनी दिला.महाडिक यांचा अधर्म...गेल्या सभेत आमदार सतेज पाटील यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीने अध्यक्ष पाटील हैराण झाले होते. तसे यावेळी होऊ नये म्हणून अध्यक्षांना बाजूला ठेवून इतिहासात प्रथमच संघाचे नेते सभेला उपस्थित राहिले. अध्यक्षांना उत्तरे देता येत नाहीत म्हणून महाडिकांना अहवाल हातात घेऊन ‘मंजूर’ म्हणावे लागले यावरून संघाचा कारभार संचालक नव्हे तर कोण चालविते हे जिल्ह्याला समजले, अशी टीका बाबासाहेब देवकर यांनी केली. ‘धर्माची भाषा करणारे महाडिक अधर्माचा व्यवहार कसा करतात?’ असाही टोला त्यांनी लगावला.‘अमूल’च्या पदरात काय पडले?‘गोकुळ’ला पर्याय नसून ‘अमूल’ने प्रयत्न करून बघितले; पण त्यांच्या पदरात काही पडले नाही. आमचा उत्पादक कणखर आहे, तो इकडे-तिकडे बघणार नाही, असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला.