कोल्हापूर: डोस उपलब्ध होतील तसे लसीकरणाचा वेग वाढवण्यात येत आहे. मंगळवारी आणखी ११ हजार ८१० जणांनी लस घेतली. त्यात कोविशिल्ड व कोवॅक्सिन या दोन लसींचा समावेश असून १८ ते ४४ वयोगटांतील तरुणांनी सर्वाधिक लस घेतली आहे.
जिल्ह्यात मागील आठवड्यात कोवॅक्सिन व कोविशिल्ड या लसींचे ४३ हजार डोस उपलब्ध झाले आहेत. हे प्राधान्याने दुसरा डोस असणाऱ्यांना देण्यात येतील, असे सांगण्यात आले तरी याच काळात १८ ते ४४ या तरुण वयोगटांतील लसीकरणालाही सुरुवात करण्यात आली. मंगळवारी झालेल्या लसीकरणामध्ये सर्वाधिक ४ हजार ७०१ लसींचा डोस याच तरुण वयोगटाला देण्यात आला आहे. मंगळवारी पहिला डोस ६ हजार ३०४ तर दुसरा डोस ५ हजार ५०६ जणांनी घेतला. त्यातही कोविशिल्डचा ७ हजार ६१० तर कोवॅक्सिनचा डोस ४ हजार २०० जणांनी घेतला.