कोल्हापूर : नाविण्यपूर्ण योजनांना पाठबळ, पर्यावरणपूरक विकास कामांचा नियोजन, मुलभूत नागरी सुविधांसाठी असलेली जादा तरतुद, पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करण्यावर दिलेला भर यासह समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न असलेले कोल्हापूर महानगरपालिकेचे सन २०२३-२०२४ सालाचे ११५३ कोटी ९२ लाखाचे नवीन अंदाजपत्रक गुरुवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी उप समिती समोर सादर केले. या अंदाजपत्रकात हवा प्रदुषण, नदी प्रदुषण कमी करण्याचा तसेच काळम्मावाडी थेट पाईपलाईन ही महत्वाकांक्षी पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.कोल्हापूर महापालिकेत गेल्या अडीच वर्षापासून प्रशासकीय कारकीर्द सुरु आहे. त्यामुळे गुरुवारी प्रशासक बलकवडे यांनी उपसमितीसमोर हे अंदाजपत्रक सादर केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. गतवर्षी हाती घेतलेल्या कोटीतिर्थ तलाव संवर्धन, गळतीशोध मोहिम, पर्यावरणपूरक गणेश विसर्जन दुसरा टप्पा, बहुमजली पार्कींग इमारत, अमृत अभियान १ मधील कामे आदी पूर्ण करण्याचा या आर्थिक वर्षात प्रशासनाचा प्रयत्न राहणार असल्याचे बलकवडे यांनी सांगितले. नवीन प्रथमच शहरातील गळती रोखून त्यावर उपाययोजना करण्याकरिता पाण्याचे लेखापरीक्षण करण्याचा, शहरातील सर्व मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचा, ईलेक्ट्रीक वाहनांसाठी ई चार्जींग सेंटर उभारण्याचा, हरितपट्टे विकसित करण्याचा संकल्प प्रशासनाने केल्याचेही बलकवडे यांनी सांगितले. महापालिकेचे सन २०२३-२०२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात अव्वल शिल्लकेसह महसूली व भांडवली अपेक्षीत जमा ७५४ कोटी ४४ लाख असून विशेष प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या प्रकल्पांसाठी अपेक्षीत जमा ३३१ कोटी ५८ लाख तर महिला बाल कल्याण व केंद्रीय वित्त आयोगाकडून ६७ कोटी ९० लाख असे मिळून ११५३ कोटी ९२ लाख रुपये अपेक्षीत जमा दाखविण्यात आली आहे.
कोल्हापूर महापालिकेचे ११५३ कोटी ९२ लाखांचे अंदाजपत्रक सादर; मुलभूत, पर्यावरणपूरक, नाविण्यपूर्ण योजनांना पाठबळ
By भारत चव्हाण | Published: March 23, 2023 4:23 PM