भीमगोंडा देसाई -कोल्हापूर -कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या अकरा महिन्यांत तब्बल ११६८ जणांना नव्याने ‘एचआयव्ही’ची लागण झाल्याचे जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभागाने केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले. हा विभाग वर्षाला सुमारे साठ हजारांहून जास्त लोकांची तपासणी करतो. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत नव्याने लागण होण्याचे प्रमाण कमी असले तरी नव्याने लागण होत असलेल्यांची संख्याही चिंताजनक आहे. असुरक्षित, विवाहबाह्य, अनेकांशी ठेवले जाणारे लैंगिक संबंध हे एचआयव्ही होण्याचे मुख्य कारण आहे. अजूनही एड्स पूर्णपणे बरा होण्यासाठी औषध शोधून काढण्यात वैद्यकशास्त्राला यश आलेले नाही. त्यामुळे सध्या तरी प्रतिबंध हाच उपचार आहे. एड्स झाला की अकाली मृत्यू ठरलेलाच आहे. एचआयव्ही झालेल्या व्यक्तीला अजूनही समाज स्वीकारत नाही. बाधित व्यक्तीचे आयुष्य वाढविण्यासाठी प्रत्येक महिन्याला मोफत औषधे दिली जातात. प्रौढ वयोगटात असुरक्षित लैंगिक संबंध ठेवण्याचे प्रमाण अधिक असते; त्यामुळे नव्याने ‘एचआयव्ही’ची लागण होण्यात तरुणांची संख्या मोठी आहे; म्हणूनच ‘एचआयव्ही’ कशामुळे होतो, होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी, यासाठी व्यापक जागृती महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या माध्यमातून केली जात आहे. देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया आणि समलिंगी संबंध ठेवणारे पुरुष कोण आहेत, यांचा सर्व्हे केला आहे. सर्व्हेतून मिळालेल्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करून प्रतिबंधात्मक उपायांसंंबंधी मार्गदर्शन केले जात आहे. शाळा, महाविद्यालयांत जागृती केली जात आहे. महिन्याला ६० हजार निरोध...जिल्ह्यातील देहविक्रय करणाऱ्या महिलांना ३५ हजार, तर समलिंगी संबंध ठेवून घेणारे पुरुष यांना २५ हजार निरोध (कंडोम्स) प्रत्येक महिन्याला स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेतर्फे मोफत पुरविले जातात. एडसपासून संरक्षण म्हणून जिल्ह्यात जागृतीचे काम सातत्याने केले जात आहे. त्यामुळे सात-आठ वर्षांच्या तुलनेत नव्याने मिळणाऱ्या ‘एचआयव्ही’ग्रस्थांची संख्या कमी होत आहे. - दीपा शिपूरकर, जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण अधिकारी
अकरा महिन्यांत ११६८ जणांना ‘एचआयव्ही’
By admin | Published: June 11, 2015 10:58 PM