कोल्हापूर : एएस ट्रेडर्स कंपनीचा भूलभुलैया दाखवून लोहितसिंग सुभेदार आणि त्याच्या साथीदारांनी गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये उकळले. त्याच पैशांवर त्यांनी देश-विदेशात मौजमजा केली. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या कारवाईपासून पळ काढण्यासाठी त्यांची धावपळ सुरू झाली.
पोलिसांनी गेल्या चार महिन्यांत एएसचे संचालक आणि एजंटकडून १२ कोटींची मालमत्ता जप्त केली. कंपनीचा प्रमुख लोहितसिंग सुभेदार याचा रुबाब उतरला असून, दीड वर्षांपूर्वी बाउन्सरसोबत ग्रँड एन्ट्री करणारा लोहितसिंग आता हातात बेड्या आणि पोलिसांच्या गराड्यात अडकला आहे.१२ कोटींची मालमत्ता निष्पन्नआर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपास जाताच तत्कालीन तपास अधिकारी निरीक्षक औदुंबर पाटील यांनी संशयित अमित शिंदे, विजय पाटील, संतोष मंडलिक, प्रवीण पाटील, चांदसो काझी आणि नामदेव पाटील यांच्याकडून चार कार आणि तीन दुचाकी जप्त केल्या होत्या. सध्याच्या तपास अधिकारी निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी बाबासो धनगर आणि बाबू हजारे यांनी मुंबईत खरेदी केलेले सहा फ्लॅट, वंदूर (ता. कागल) येथील पाच एकर जमीन, उजळाईवाडी, मुडशिंगी, केआयटी कॉलेज येथील तीन प्लॉटचा शोध घेऊन दोन दुचाकी जप्त केल्या. अमित शिंदे याचे कदमवाडी येथील पेंटहाउस, एक फ्लॅट, पाडळी येथील १२ गुंठे जागा, पळसंबे (ता. गगनबावडा) येथील आठ एकर जमिनीचा शोध घेऊन कागदपत्रे जप्त केली. बाबासो धनगर याची एक कार आणि एक दुचाकी जप्त केली. श्रुतिका सावेकर हिचे सहा लाख रुपयांचे दागिने, तसेच लोहितसिंगच्या पत्नीचे २८ लाखांचे दागिने जप्त केले. एएस ट्रेडर्स आणि तिच्या उपकंपन्यांच्या बँक खात्यांवरील तीन कोटी ९६ लाखांची रक्कम गोठवण्यात आली, अशी १२ कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आईच्या नावाने कंपनीलोहितसिंग याच्या आईचे नाव अलका सुभेदार असे आहे. आईच्या नावाची अद्याक्षरे घेऊन त्याने ए.एस. ट्रेडर्स असे कंपनीचे नामकरण केले. त्याचे वडील बँकेतून सेवानिवृत्त झाले आहेत. ते दोघेही पलूस (जि. सांगली) येथे राहतात, तर त्याच्या पत्नीने घटस्फोट घेतला असून, ती मुलीसह पुण्यात राहते.
फसवणूक १५०० कोटींची?एएस ट्रेडर्सने एकूण तीन हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती तत्कालीन तपास अधिकारी औदुंबर पाटील यांनी दिली होती. मात्र, फसवणुकीची व्याप्ती १५०० कोटींपर्यंतच असू शकते, अशी माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली. अटकेतील लोहितसिंगच्या तपासातून नेमकी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.