कोल्हापूर : हमीदवाडा (ता. कागल) येथील कृषिबंध अॅग्रो लिमिटेडने जादा व्याजाचे आमिष दाखवून १५ हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची १२ कोटींची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. कोल्हापूरसह, कर्नाटक, गोवा येथील नागरिकांनी ५०० हून अधिक एजंटांमार्फत या कंपनीत पैसे गुंतविले आहेत. दीड वर्षापासून मात्र कंपनीने पैसे देण्यास टाळाटाळ सुरुवात केली आणि आता गाशा गुंडाळल्याने अध्यक्ष बंडोपंत कुंडलिक पाटील (म्हाकवेकर) यांच्यासह संचालकांवर कारवाई करण्याची मागणी बुधवारी ताराराणी महिला आघाडीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे केली.कृषिबंध अॅग्रो लिमिटेड ही कंपनी २०११ साली राजारामपुरी व हमीदवाडा येथे सुरू झाली. ५०० हून अधिक एजंटांमार्फत सर्वसामान्यांना शेळीपालन, दुग्ध तसेच अन्य व्यवसाय उभे करून, आर्थिक फायदा व रोजगाराचे आमिष दाखवून तिने गुंतवणूक करायला भाग पाडले. पुनरावर्ती ठेव, मुदतबंद ठेव अशा विविध योजनांतून १०० रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत १५ हजार नागरिकांनी यात गुंतवणूक केली. केवळ कोल्हापुरातून सात हजार नागरिकांनी पाच कोटींच्या आसपास या कंपनीत गुंतवणूक केली आहे.गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतरही नागरिकांकडून गुंतवणूक करून घेण्यात आली. पैसे व्याजासह परत करण्याची वेळ आली तेव्हा टाळाटाळ सुरू झाली. एजंटांना दिलेले धनादेश वटले नाहीत. कंपनीचे कार्यालय आणि संचालकांचे फोनही बंद आहेत. दाद मागण्यासाठी घरावर मोर्चा नेला तेव्हा उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. कंपनीविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी बंगलोर येथील न्यायालयाने गुंतवणूकदारांच्या बाजूने निकाल दिला आहे. मात्र या आदेशालाही दाद देण्यात आलेली नाही.
त्यामुळे कंपनीची चौकशी व्हावी, अध्यक्ष बंडोपंत पाटील (म्हाकवेकर), म्होरके संचालकांची तसेच सदस्यांची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ताराराणी महिला आघाडीने केली आहे. यावेळी संस्थापक अध्यक्षा श्रद्धा महागांवकर, अश्विनी खोत, सूर्यकांत डवरी, नंदकुमार डवरी, सुवर्णा शिंदे, दीपाली मंडले यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
बंडोपंत पाटील हे बाजार समितीचे दहा वर्षे अध्यक्ष होते. त्यानंतर गोकुळ व बिद्री कारखान्याचेही संचालक म्हणून त्यांनी काम केले. सुरुवातीला ते बालाजी ड्रॉ काढत होते. त्यामाध्यमातून लोकांना बक्षीसे द्यायचे. त्यातून विश्र्वास निर्माण झाल्यावर कृषीबंध संस्था स्थापण करून त्यांनी पैसे गोळा केले व ही गुंतवणूक प्लॉटमध्ये करणार असून तुम्हांला चारदोन वर्षात लगेच पैसे परत करणार असे आश्वासन ते त्यावेळी देत होते. त्यास भुलून लोकांनी गुंतवणूक केली व आता ती बुडाल्यावर आमची फसवणूक झाली म्हणून त्यांच्या घरावर मोर्चे काढू लागले आहेत.