कोल्हापूर : महापालिका निवडणुकीच्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम विभागीय कार्यालयांतर्गत बारा प्रभागांत काँग्रेस पक्षाने जोरदार मुसंडी मारल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. वैयक्तिक संपर्क व जनसंपर्क असलेल्या उमेदवारास मतदारांनी कौल दिला. सर्वच प्रभागांत चुरशीने लढती झाल्या. त्यामुळे मतदानही चांगले झाले. अनेक प्रभागांत अनपेक्षित निकाल दिसला; त्यामुळे प्रस्थापितांना धक्का बसला. रायगड कॉलनी-जरगनगर प्रभागात भाजपच्या गीता श्रीपती गुरव आणि काँग्रेसच्या वैभवी संजय जरग यांच्यात लढत झाली. ११७० मते घेऊन गुरव विजयी झाल्या. ११४० इतकी दुसऱ्या क्रमांकाची मते जरग यांना पडली. तिसऱ्या क्रमांकाची मते नंदा गवळी या राष्ट्रवादीच्या उमेदवारास मिळाली. भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक नाना जरग यांच्या वैभवी या स्नुषा. मात्र त्यांना भाजपकडून उमेदवारी डावलली. त्यामुळे नाना जरग यांनी सून वैभवी यांना काँग्रेसमधून रिंगणात उतरविले. लढत चांगली झाली; पण केवळ ३० मतांनी पराभव झाला.साळोखेनगरातूनही सात उमेदवार होते. काँग्रेसच्या उमेदवार प्रतीक्षा पाटील यांच्यात आणि शिवसेनेच्या श्वेता बकरे-जाधव यांच्यात लढत झाली. पाटील विजयी झाल्या. तिसऱ्या क्रमांकाची मते भाजपचे उमेदवार संजीवनी शेटे यांना मिळाली. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने शिल्पा तेंडुलकर अपक्ष म्हणून रिंगणात राहिल्या. याचा फटका भाजपच्या उमेदवारास बसला. आपटेनगर-तुळजाभवानी प्रभागात अपक्ष उमेदवार राजू दिंडोर्ले आणि भाजपच्या संगीता सावंत यांच्यात लढत झाली. दिंडोर्ले यांनी प्रभागात स्वत:च्या पैशाने सीसीटीव्ही बसविले. यामुळे मतदारांनी पक्षाच्या उमेदवारांना झिडकारून अपक्ष दिंडोर्ले यांना विजयी केले. लढतीमध्ये पक्षाच्या उमेदवारांनी दिंडोर्ले यांना गृहीत धरले नव्हते; पण सुज्ञ मतदारांनी त्यांना निवडून देत धक्का दिला. तपोवन प्रभागात भाजपचे विजयसिंह खाडे-पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रमोद पोवार यांच्यात लढत झाली. खाडे-पाटील ८५९ मतांनी विजयी झाले. पोवार यांच्यामागेही राष्ट्रवादीने ताकद लावली होती; पण मोठ्या मताधिक्याने खाडे-पाटील विजयी झाले. विनायक वाळवेकर या अपक्ष उमेदवारास बारा, तर ‘नोटा’ला ३५ मते मिळाली आहेत.रामनंदनगर-जरगनगर प्रभागात विद्यमान नगरसेवक व राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील पाटील व भाजपचे प्रशांत पवार यांच्यात लढत झाली. नगरसेवक असताना केलेले प्रभावी काम, सर्वसामान्य वागणे, नेहमी मदतीला धावून येणे या स्वभावामुळे पाटील विजयी झाले. पवार यांच्यापेक्षा पाटील यांना १३९ मते अधिक मिळाली. पवार व पाटील यांच्यात शेवटपर्यंत काटा लढत झाली. सुभाषनगर प्रभागात ताराराणीच्या उमेदवार सविता घोरपडे व काँग्रेसकडून कौसर बागवान यांच्यात लढत झाली. उमेदवार कमी असल्यामुळे मतविभागणी झाली नाही. महाडिक गटाकडून प्रचारासाठी लावलेल्या मोर्चेबांधणीमुळे घोरपडे यांचा विजय सुकर झाला. मंगेशकरनगर प्रभागात भाजपचे विजय सूर्यवंशी व काँग्रेसचे संदीप सरनाईक यांच्यात लढत झाली. सूर्यवंशी विजयी झाले. येथे शिवसेनेचे उमेदवार शिवाजी गवळी यांना केवळ ३७२ मते मिळाली. या प्रभागात शिवसेनेचा प्रभाव आहे. यामुळे शिवसेनेचे गवळी यांच्याशी लढत होईल, असे वाटत होते. मात्र अनपेक्षितरीत्या सरनाईक यांनी बाजी मारून दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली. शासकीय वसतिगृह प्रभागात काँग्रेसच्या अश्विनी रामाणे आणि राष्ट्रवादीच्या अश्विनी लोळगे यांच्यात लढत झाली. रामाणे विजयी झाल्या. भाजपच्या उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. शिवसेनेच्या छाया मस्के यांना केवळ २५ मते मिळाली आहेत. ‘नोटा’ला येथे २६ मते आहेत. (प्रतिनिधी)भूपाल शेटेंना विकासकामांचे पाठबळ जवाहरनगर प्रभागात विद्यमान नगरसेवक व काँग्रेसचे उमेदवार भूपाल शेटे व राष्ट्रवादीचे सुहास सोरटे यांच्यात लढत झाली. नगरसेवक असताना केलेली विकासकामे, भ्रष्टाचाराची चव्हाट्यावर आणलेली प्रकरणे यामुळे शेटे यांना पुन्हा मतदारांनी नगरसेवक केले. सोरटे यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीने प्रतिष्ठा पणाला लावली होती; पण यश आले नाही.
बारा प्रभागांत काँग्रेसची मुसंडी
By admin | Published: November 03, 2015 12:37 AM