संदीप आडनाईककोल्हापूर : खनिजांचा मौल्यवान स्रोत असलेल्या पॉलिमेटॅलिक सल्फाइड्सच्या शोधासाठी गोवास्थित नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्चच्या नेतृत्वाखालील १२ भारतीय संशोधकांचे एक पथक ४ हजार मीटर खोल समुद्रात नॉर्वेजियन ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हेईकल वापरून महिनाभर काम करत आहे. या मोहिमेसाठी सरकारने ४ हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे, अशी माहिती गोवा येथील नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्चचे वरिष्ठ संशोधक डॉ. बबन इंगोळे यांनी दिली.
गोव्यातील नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्चचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ जॉन कुरियन पी हे या समुद्र शोध कार्यक्रमाचे नेतृत्व करत आहेत. या पथकाने २७ मार्चपासून मॉरिशस येथून समुद्राखालून कामाला सुरुवात केली असून, ५ मे रोजी मॉरिशस येथे समुद्रापृष्ठावर येतील. मध्य हिंद महासागरात समुद्राच्या तळावरील मौल्यवान खनिज साठ्यांच्या १५ निवडक जागांचे ते सर्वेक्षण करतील. खोल समुद्रात नैसर्गिकरीत्या असलेल्या हायड्रोथर्मल व्हेंट्सच्या आसपास पॉलिमेटॅलिक सल्फाइड साठे सापडण्याची शक्यता आहे. तांबे, निकेल, जस्त आणि मँगनीज सारख्या खनिजांचे हे स्त्रोत आहेत.
खास पाण्याखालील वाहनांचा वापरहगिन सुपीरियर हे खास पाण्याखालील वाहन वापरून या खनिजांचा समुद्रतळाजवळ ४००० मीटर खोल समुद्रात संशोधक डुबकी मारून याचा शोध घेत आहेत. अर्जिओ सर्चर १२ हे नॉर्वेजियन रिसर्च व्हेसेल या पथकाला मदत करत आहे. उच्च-रिझोल्यूशन प्रतिमा कॅप्चर करून या जागा ते निश्चित करेल. या रोबोटिक अंडरवॉटर व्हेइकलमध्ये डेटाचा खजिना जमा करण्यासाठी बोर्डवर भूभौतिकीय आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेन्सर्सचा स्वतंत्र सूट आहे. ६० तासांची बॅटरी आयुष्य असलेले हे वाहन एका वेळी दोन दिवस पाण्याखाली राहील आणि नंतर वर येईल.
पृथ्वीवरील खनिज साठे कमी होत आहेत. त्यामुळे सागरी संसाधनांवर अवलंबून राहावे लागेल. या खनिजांची मागणी २०-३० वर्षांमध्ये झपाट्याने वाढेल, त्यानंतरच हरित ऊर्जा आणि बॅटरी स्टोअरेजकडे जाऊ. या मोहिमेत व्हेंट साइट्सचे थ्रीडी मॉडेल विकसित करण्यात येणार आहे. - डॉ. बबन इंगोळे, वरिष्ठ संशोधक, नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च, गोवा