कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनामार्फत सुरू असलेल्या संजीवनी अभियानांतर्गत सर्वेक्षणात घरात बसून असलेल्या परंतु त्यांना कल्पना नसलेल्या अनेक व्यक्ती कोरोनाबाधित म्हणून समोर येऊ लागल्या आहेत. बुधवारी झालेल्या सर्वेक्षणात १५४ व्यक्तींपैकी १२ व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले.
महापालिकेच्या वतीने दि. २३ मेपर्यंत ‘संजीवनी अभियान’ राबविण्यात येत आहे. व्याधिग्रस्त नागरिकांना कोरोनाचा होणार संसर्ग रोखण्याबरोबरच कोरोनामुळे होणारा मृत्युदर कमी करण्यासाठी शहरात संजीवनी अभियान उपयोगी पडणार आहे. संजीवनी अभियानामुळे कोरोनाचे ‘अर्ली डिटेक्शन’ होण्यास महापालिकेस मदत होणार असून, या अभियानाला शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.
शहरात १०८ वैद्यकीय पथकांद्वारे सर्व्हेक्षण करण्यात आले. यामध्ये कोविडसदृश लक्षणे असणारे ४४ नागरिक आढळून आले. त्यामध्ये १५४ जणांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. यांपैकी १२ पॉझिटिव्ह व १४२ निगेटिव्ह आले; तर ५०१ व्याधिग्रस्त नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. बुधवारी ६५५ व्याधिग्रस्त नागरिकांची तपासणी करण्यात आली.
या अभियानात उपायुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, सहायक विनायक औंधकर, शहर अभियंता नारायण भोसले, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव यांनी सर्वेक्षणादरम्यान नागरिकांचे प्रबोधन केले.
दहा दिवसात १६२ पॉझिटिव्ह
शहरात गेल्या दहा दिवसांत महापालिकेच्या आरोग्य पथकांमार्फत ७०२० नागरिकांची वॉक टेस्ट घेण्यात आली. यामध्ये ३७५४ नागरिकांचे स्राव तपासले आहेत. यामध्ये १६३ पॉझिटिव्ह आहेत; तर ५०३ व्याधिग्रस्त नागरिकांचे स्राव तपासले असून यामध्ये ६३ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
फोटो क्रमांक - १९०५२०२१-कोल-केएमसी०२
ओळ - कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या संजीवनी अभियानात बुधवारी उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी भाग घेऊन नागरिकांचे प्रबोधन केले.