चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : उसाचा रस हे कृषी उत्पादन नाही. त्यामुळे त्यावर १२ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) भरावा लागेल, असा निर्णय उत्तर प्रदेशातील जीएसटीच्या ॲडव्हान्स रुलिंग ॲथॉरिटीने दिला आहे.उत्तर प्रदेशातील गोविंद सागर मिल्स या कारखान्याने उसाचा रस व्यापारी तत्त्वावर विकण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे या रसावर जीएसटी लागू होतो का, याची माहिती घेण्यासाठी नोव्हेंबर २०२२ मध्ये या कारखान्याने ॲडव्हान्स रुलिंग ॲथॉरिटीकडे संपर्क साधला असता, हा निर्णय देण्यात आला. त्यात म्हटले आहे की, उसाचा रस हा साखर कारखान्यात उसाचे गाळप करून तयार केला जातो. तो शेतकरी तयार करत नाही. तसेच त्याचे स्वरूप आणि प्रक्रियाही बदलते. साखर, इथेनॉल तयार करण्यासाठी तो कच्चा माल ठरतो. त्यामुळे कृषी उत्पादनासाठी लागणाऱ्या तीनही अटींची पूर्तता यामध्ये होत नाही.जर हे कृषी उत्पादन नसेल, तर त्याचे वर्गीकरण कसे करायचे, या प्रश्नावर या निर्णयात म्हटले आहे की, ऊस हा गवत किंवा वनस्पतीचा एक प्रकार असतो, ऊस हा फुलांच्या रोपापासून किंवा बी पेरून तयार होत नाही. त्यामुळे उसाला फळ मानता येत नाही. उसाच्या चिपाटे खाणे किंवा ते पचणे शक्य नाही, म्हणून त्याला भाजी म्हणणेही योग्य नाही. त्यामुळे रसावर १२ टक्के जीएसटी भरावा लागेल.
ॲडव्हान्स रुलिंग ॲथॉरिटी म्हणजे काय?एखाद्या वस्तू किंवा सेवेवर जीएसटी लागू होतो का? झाला तर तो किती टक्के ? याची माहिती उद्याेग, व्यवसाय सुरू करण्याआधीच विचारून घेण्याची सुविधा म्हणजेच ही ॲथॉरिटी.
रस्त्यावरील उसाच्या रसावर जीएसटी नाही
रस्त्यावर किंवा ऊसाचा रस विकणाऱ्या दुकानातील उसाच्या रसावर जीएसटी बसेल काय तर त्याचे उत्तर नाही असेच असेल. मात्र, तोच रस जीएसटी क्रमांक धारण करणाऱ्या दुकानातून घेतला तर त्याच्या बिलात जीएसटी अंतर्भाव होऊ शकतो.