कोल्हापूर : महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी संयुक्त मोहीम राबवून शहरातील विविध रस्त्यांवर बेवारस स्थितीत पडून असलेल्या १२ कार शुक्रवारी जप्त करण्यात आल्या तर ८८ कारवर नोटीस लावून सदरच्या कार रस्त्यावर हटविण्यात याव्यात अन्यथा जप्त केल्या जातील, असा इशारा देण्यात आला.
दोन दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीत शहराच्या विविध रस्त्यांवर बेवारस स्थितीत पडून वाहतूक तसेच पार्किंगला अडथळा ठरणाऱ्या कार जप्त करण्याची मोहीम महापालिका व पोलीस प्रशासनाने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शुक्रवारपासून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली. दिवसभरात शहरातील ८८ कारवर नोटिसा लावण्यात आल्या. संबंधित मालकांनी त्या तत्काळ हटवाव्यात, असे नोटिसीमध्ये म्हटले आहे.
शुक्रवारी दिवसभरात राजारामपुरी, पांजरपोळ, आझाद चौक या परिसरातील १२ कार जप्त करण्यात आल्या. क्रेनच्या सहाय्याने त्या हटवून बुद्ध गार्डन येथील पालिकेच्या जागेत नेऊन ठेवण्यात आल्या आहेत. ही कारवाई शहर अभियंत्ता नेत्रदीप सरनोबत, रवी कांबळे, वाहतूक शाखेचे राजेंद्र माने व प्रल्हाद खाडे यांनी केली. यापुढे ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
फोटो क्रमांक - २५१२२०२०-कोल-ट्रॅफिक ॲक्शन
ओळ - कोल्हापूर महानगरपालिका व वाहतूक शाखा पोलिसांनी शुक्रवारपासून शहरातील बेवारस कार जप्त करण्याची मोहीम हाती घेतली.