नसिम सनदी : लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : केवळ समज-गैरसमजांमुळे तुटण्यापर्यंत आलेले संसार महिला बालविकास विभागाच्या सखी वन स्टॉप उपक्रमामुळे सावरू लागले आहेत. जिल्ह्यात गेल्या सात महिन्यात तब्बल १२२ जणींची संसारवेल पुन्हा बहरली आहे. विशेष म्हणजे आलेल्या १३० तक्रारींपैकी १२२ तक्रारी या कोर्टाची पायरी न चढता केवळ समुपदेशनाने सुटल्या आहेत.
महिलांवरील अन्याय, अत्याचाराची कुठेही जाहीर वाच्यता न करता त्याच्या सोडवणुकीसाठी म्हणून एकाच छताखाली समुपदेशन, वैद्यकीय, न्यायालयीन बाबी याव्यात म्हणून राज्य सरकारने ‘सखी वन स्टॉप’ या नावाने उपक्रम सुरू केला. सुरुवातीपासूनच याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापुरात विचारेमाळ येथे १६ खोल्यांच्या कार्यालयात केंद्राचे काम चालते. १४ कर्मचाऱ्यांचा स्टाफ मंजूर आहे, पण सध्या १० जण कार्यरत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काम चालणाऱ्या या केंद्राच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पाचगावमधील आनंदीबाई बहुउद्देशीय महिला संस्थेकडे दिली आहे.
चौकट ०१
लॉकडाऊन काळात तक्रारींत वाढ
लॉकडाऊन काळात तक्रारींचे प्रमाण वाढले. आलेल्या १३० पैकी तब्बल ९९ तक्रारी या लॉकडाऊन काळात आणि त्याही पती-पत्नीच्या वादाच्याच होत्या. या काळात बाहेर जाता येत नसल्याने ‘सखी वन स्टॅाप केंद्रा’ने यु ट्यूब, फेसबुक, व्हाॅटस ॲपसारख्या समाजमाध्यमासह फोनवरूनही संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यावर महिलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि या सर्व तक्रारींचे फोनवरच निराकरणदेखील झाले हे जास्त मोलाचे.
चौकट ०२
केंद्राकडे आलेल्या १३० पैकी १२२ तक्रारींचे निराकरण झाले आहे. ७ तक्रारींची कार्यवाही सुरू आहे. एक तक्रारदाराची वैद्यकीय चाचणी झाली आहे. उर्वरीत तक्रारी केवळ समुपदेशाने सुटल्या आहेत.
चौकट ०३
काय असते तक्रारीचे स्वरूप
पतीकडून मारहाण, कुटुंबीयांशी न पटणे, आर्थिक विवंचना, नवऱ्याचे व्यसन, जवळच्या नातेवाईकांकडून अत्याचार, विनयभंग
प्रतिक्रिया
महिलेवर अन्याय, अत्याचार होत असेल तर तिने व्यक्त व्हावे यासाठी या केंद्राची भूमिका महत्त्वाची ठरते. तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेणे, जास्तीत जास्त नाते सावरण्याचा प्रयत्न करण्यावर भर दिला जातो, अगदीच टोकाचे असेल तरच कोर्टाकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. आम्ही गेल्या सात महिन्यांतही एकही केस कोर्टापर्यंत पोहोचू दिलेली नाही.
वैशाली महाडिक, अध्यक्षा, आनंदीबाई महिला संस्था