इचलकरंजी : येथील संस्थानकालीन राजवाड्याचा मुख्य दरवाजा सुमारे १२५ वर्षांनी पुन्हा नव्याने तयार करण्यात आला आहे. ऐतिहासिक पद्धतीने हुबेहूब दिसणाऱ्या या दरवाजामुळे राजवाड्याला नवीन झळाळी प्राप्त झाली आहे.सुमारे १७५ वर्षांपूर्वी तत्कालीन इचलकरंजीच्या उंच टेकडीवर राजवाड्याची देखणी वास्तू उभारण्यात आली. दूरवरून दिसणारे राजवाड्याचे मनोरे, भोवताली बारा बुरुजांची तटबंदी, राजवाड्यासमोर उजव्या बाजूस घोड्यांची पाग, डाव्या बाजूला हत्तीखाना, व्यंकटराव शाळा, सरकारी तालीम, अशी त्यावेळच्या राजवाड्याची स्थिती होती.देशाच्या स्वातंत्र्यानंतर संस्थाने विलीन झाली. इचलकरंजीचे अधिपती श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांना शिक्षणाची मुख्य आवड होती. सध्याचे जहागीरदार श्रीमंत आबासाहेब घोरपडे यांनी मागणीप्रमाणे राजवाडा डीकेटीई या संस्थेला दिला. त्यानंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी राजवाड्याचे संवर्धन केले. दरबार हॉल, दिवाणखाना, कारंजाचा चौक, आकर्षक झुंबरे यांनी राजवाड्याला उठाव दिला. आता जुना दरवाजा काळाच्या ओघात जीर्ण झाल्यामुळे तो बदलणे गरजेचे होते. म्हणून नवीन दरवाजा करून घेण्यात आला आहे, अशी माहिती माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली.यावेळी संस्थेच्या मानद सचिव डॉ. सपना आवाडे, संस्थेचे पदाधिकारी व प्राचार्य डॉ. पी. व्ही. कडोले उपस्थित होते. (प्रतिनिधी)नवीन दरवाजासाठी उत्तम दर्जाचे लाकूड, लोखंडी अणकुचीदार खिळे, दगडाच्या खोबणीत शिशाच्या गोळ्यावर तोलून फिरणारा महाकाय दरवाजा आता उभा केला आहे. रायगडचा दरवाजा व येथील राजवाड्याचा दरवाजा यांच्यात बरेच साम्य आहे. सदरचा दरवाजा औरंगाबाद येथील कारागीर दरबारसिंग होलिये व त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केला आहे, असा हा दरवाजा जहागीरदार आबासाहेबांचे चिरंजीव श्रीमंत यशवंतराव व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते पूजन करून १ मे रोजी उघडला जाणार आहे, असेही आवाडे यांनी स्पष्ट केले.
इचलकरंजीतील राजवाड्याला १२५ वर्षांनी नवा दरवाजा
By admin | Published: April 29, 2017 1:06 AM