लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेल्या १४ दिवसांपासून एकही कोरोना रूग्ण न मिळाल्याने जिल्ह्यातील १०२५पैकी १२७ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. यामध्ये आजरा तालुक्यातील ग्रामपंचायतींची संख्या सर्वाधिक आहे.
जिल्ह्याला पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा तडाखा जोरात बसला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेल्याचे मे आणि जून महिन्यात दिसून आले आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात येण्या-जाण्यावर असणारे निर्बंध, गावातच संस्थात्मक विलगीकरणाची सक्ती, आजाराचा अंदाज नसल्याने भीतीमुळे घेतली गेलेली दक्षता यामुळे ग्रामीण भागातील संसर्गाला थोडा प्रतिबंध झाला होता. परंतु, दुसऱ्या लाटेवेळी मात्र गावागावात आणि घराघरात बाधितांची संख्या वाढू लागली. कोरोना झाल्यानंतरही घरातच राहण्याचाही तोटा यावेळी झाला. त्यामुळे एकाच घरातील रूग्णांची संख्याही वाढत गेली.
या पार्श्वभूमीवर वरील आकडेवारीही दिलासादायक आहे. या १२७ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात २३ जूनपासूनच्या आधीच्या १४ दिवसांत कोरोनाचा एकही रूग्ण आढळलेला नाही. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांनी पुन्हा संसर्ग होऊ नये, यासाठी अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.
चौकट
तालुकावार कोरोनामुक्त ग्रामपंचायती
आजरा ३९, भुदरगड ०, गडहिंग्लज ३, गगनबावडा २०, चंदगड १३, हातकणंगले ३, कागल १०, करवीर १७, पन्हाळा ४, राधानगरी ३, शाहूवाडी १३, शिरोळ २
चौकट
गेल्या सव्वा वर्षात जिल्ह्यातील प्रत्येक गावात कोरोनाची लागण झाली आहे. त्या अर्थाने एकाही ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र हे कोरोनामुक्त नव्हते. मात्र, गेल्या १४ दिवसांपासून गावात एकही कोरोनाचा रूग्ण नसलेल्या १२७ ग्रामपंचायती सध्या असून, ही संख्या वाढत चालली आहे.
- अरूण जाधव
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर