कसबा बावडा : येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे १२७२ सभासद प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी सुनावणी घेऊन अपात्र ठरविले. बुधवारी याबाबत सुनावणी झाली. त्यात १३४६ पैकी १२७२ सभासदांना अपात्र ठरवण्यात आहेत.
हा खऱ्या अर्थाने सत्याचा विजय झाला आहे. या अपात्र सभासदांबाबत यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात आमची याचिका दाखल असून, आम्ही आताचा हा लागलेला निकाल पुरवणी म्हणून जोडणार आहे, अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेस कमिटीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या अपात्र झालेल्या सभासदांमध्ये शौमिका महाडिक यांच्यासह महाडिक परिवारातील दहा सदस्यांचा समावेश आहे.राजाराम कारखान्याची निवडणूक २४ एप्रिलला झाली. या निवडणुकीपूर्वी १३४६ अपात्र सभासदांवरून न्यायालयीन लढाई झाली. ज्यांच्या नावावर उसाचे क्षेत्र नाही. जे कारखान्याला कधीच ऊस घालत नाहीत व ते कार्यक्षेत्राबाहेरील आहेत, अशा सभासदांना अपात्र ठरवा म्हणून राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीने न्यायालयात धाव घेतली होती. याबाबत १४ फेब्रुवारी २०२०ला प्रादेशिक सहसंचालक साखर यांनी सर्व चौकशीअंती १३४६ सभासद अपात्र केले. हा आदेश पुढे १८ फेब्रुवारी २०२१ला तत्कालीन सहकारमंत्री यांनी कायम केला. पुढे हा निर्णय २२ सप्टेंबर २०२२ला उच्च न्यायालयाने कायम केला. मात्र, सर्वाेच्च न्यायालयात या निर्णयाला स्थगिती मिळून सभासदांची फेरसुनावणी घेण्यासाठी साखर सहसंचालक यांना सांगितले.दरम्यानच्या काळात २४ एप्रिल २०२३ला राजाराम कारखान्याची निवडणूक होऊन सत्ताधारी महादेवराव महाडिक गटाने सर्व २१ जागा १४०५ मताधिक्याच्या फरकाने जिंकून कारखान्याची सत्ता ताब्यात ठेवली. मात्र, बुधवारी लागलेल्या निकालात या १३४६ सभासदांबाबत निर्णय होऊन त्यात १२७२ सभासद अपात्र ठरविण्यात आले. या निर्णयाबाबत बोलताना सतेज पाटील म्हणाले, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कारखान्याच्या सत्तारूढ गटाने अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकून आमच्या आघाडीचे ३० उमेदवारांचे अर्ज छाननीतून बेकायदेशीरपणे अवैध ठरवले व आमचे तगडे उमेदवार निवडणूक रिंगणाबाहेर घालवले. तरीसुद्धा सभासदांनी ५ हजार ते ५५०० मते आमच्या आघाडीला दिली. निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या अपात्र सभासदांचे मतदान नसते तर आमचा विजय निश्चितच होता, हे आताच्या निकालावरून सिद्ध झाले आहे. या पत्रकार परिषदेवेळी सर्जेराव माने, मोहन सालपे आदी उपस्थित होते. प्रमुख अपात्र सभासद...शौमिका महाडिक, ग्रीष्मा महाडिक, ओमवीर महाडिक, ब्रिजगुप्त महाडिक, शंकरराव महाडिक, साधना महाडिक, माई महाडिक, दीपाली महाडिक, मनीषा महाडिक, रेश्मा महाडिक.‘राजाराम’च्या फेरनिवडणुकीची मागणी...प्रादेशिक साखर सहसंचालक यांनी १२७२ सभासद अपात्र ठरवले आहेत. या अपात्र सभासदांमुळेच आम्हाला फटका बसला आहे. त्यामुळे कारखान्याची फेरनिवडणूक घ्यावी, अशी मागणी कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केली.