इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित ही परीक्षा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आली. या परीक्षेसाठी एकूण १२९२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १२८०३ जणांनी परीक्षा दिली. सकाळी साडेदहा ते दुपारी बारा आणि दुपारी दीड ते तीन या दोन सत्रांमध्ये परीक्षा झाली. त्यासाठीच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असे होते. सकाळी नऊ वाजल्यापासून विद्यार्थी परीक्षा केंद्रावर येऊ लागले. साडेनऊ वाजल्यापासून विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग करून त्यांना परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात आला. सॅनिटायझेशन आणि मास्क बंधनकारक केले होते. जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक हे परीक्षेसाठी पर्यवेक्षक होते. प्रत्येक केंद्रावर तालुक्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे बैठपथक नेमले होते. उपशिक्षणाधिकारी, तालुका गटशिक्षणाधिकारी यांची भरारी पथके कार्यान्वित होती. दरम्यान, या परीक्षेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या राज्यात अव्वलस्थानी आहे. विद्यार्थी पात्र होण्याचे प्रमाणही राज्यात गेल्या पाच वर्षांपासून उल्लेखनीय आहे. कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून परीक्षा घेण्यात आली असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी मंगळवारी दिली.
जिल्ह्यात १२८०० विद्यार्थ्यांनी दिली ‘एनएमएमएस’ परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 4:26 AM