कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत परवानगी नसतानाही डॉल्बी घेऊन आलेल्या शहरातील वाघाची तालीम, नंगीवली, हिंदवी स्पोर्टस्, दयावान, महाकाली, राजे संभाजी, नाईट कट्टा, जुना बुधवार पेठ, बालगोपाल तालीम यांसह सुमारे १३ मंडळांवर आज, शनिवारी जुना राजवाडा व लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात्ां गुन्हे दाखल करण्यात आले. याबाबत पोलिसांनी सांगितले की, गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीस परवानगी नाकारल्यानंतरही काही मंडळे डॉल्बी घेऊन आले. त्यामुळे बराच वेळ मिरवणूक रेंगाळल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला. तसेच पोलिसांचे आदेश न पाळता गैरवर्तणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये बालगोपाल तालीम, नंगीवली तालीम, जुना बुधवार तालीम गणेश उत्सव मंडळ, हिंदवी स्पोर्टस् क्लब, दयावान ग्रुप, महाकाली भजनी मंडळ (सर्व ताराबाई रोड, शिवाजी पेठ), राजे संभाजी तरुण मंंडळ संभाजीनगर, नाईट कट्टा, बालगोपाल तालीम मंडळ, (खासबाग), उत्तरेश्वर प्रासादिक, वाघाची तालीम मंडळ (अध्यक्ष- दीपक बाळासाहेब काटकर), क्रांती बॉईज रंकाळा टॉवर (अध्यक्ष- नामदेव दादोबा लोहार), बजाप माजगावकर तालीम मंडळ, कुंभार गल्ली-पापाची तिकटी (अध्यक्ष-सुमित सुनील ब्रह्मपूर), लक्षतीर्थ वसाहत कला-क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, पी.एम. बॉईज (अध्यक्ष- अजित बाळासाहेब शिंदे), भोई गल्ली तरुण मंडळ, रविवार पेठ (अध्यक्ष- नीलेश नंदकुमार यादव), एस. पी. बॉईज शनिवार पेठ (अध्यक्ष- अनिकेत पाटील), आदींचा समावेश आहे. त्यांच्यावर डॉल्बी सिस्टीम लावलेल्या, तसेच मालक व चालक यांच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३ (एन. ओ), १३१, ३६ (ई) १३४, ६८/१४०, १०२, ११७ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्ह्यातील डॉल्बी सिस्टीम पुरविणारे मालक व चालक यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. (प्रतिनिधी)
१३ मंडळांवर गुन्हे दाखल
By admin | Published: September 14, 2014 9:37 PM