सदाशिव मोरे
आजरा :
आजरा ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन ५० खाटांचे रुग्णालय करण्याच्या प्रस्तावास मंजुरी मिळून ९ वर्षे झाली. २०१२ मध्ये १३ कोटींचा मंजूर असणारा ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव आता २२ कोटींवर गेला आहे. उपजिल्हा रुग्णालय झाल्यास रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार व शस्त्रक्रियेसाठी मोठ्या शहरात जाण्याची गरज भासणार नाही. त्याकरिता लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा व संघटितपणे नागरिकांच्या दबावाची गरज आहे.
आजरा तालुका डोंगराळ व मागास आहे. ग्रामीण रुग्णालय म्हणजे रुग्णांना संजीवनी आहे. सध्या हे रुग्णालय ३० खाटांचे आहे. तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होऊन त्याठिकाणी शस्त्रक्रिया व्हाव्यात. ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने आरोग्य सुविधा मिळाव्यात, अशी अनेक दिवसांपासून आजरा तालुक्यातील नागरिकांची मागणी आहे. २०१२ मध्ये आरोग्य विभागाच्या २ हजार कोटींच्या बृहत आराखड्यातून आजरा ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यासाठी मंजुरी मिळाली. इमारत व यंत्रसामग्रीसाठी १३ कोटींचा प्रस्ताव मंजूर झाला. मात्र, त्यानंतर पाठपुरावा न झाल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयासाठी निधीच मिळाला नाही. आजऱ्यातील रुग्णांना सर्जरी किंवा एखाद्या रोगाचे निदान होण्यासाठी कोल्हापूर, मुंबई, पुणे, बेळगाव या ठिकाणी जावे लागते व अनेक दिवस थांबून उपचार करून घ्यावे लागतात. मात्र, हे गरीब व सर्वसामान्य नागरिकांना शक्य होत नाही. त्यामुळे आजऱ्याच्या ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध करून दिल्यास ग्रामीण भागातील नागरिकांची सोय होणार आहे.
-------------------------
*
७ तज्ज्ञ डॉक्टरांबरोबर शस्त्रक्रिया होतील
उपजिल्हा रुग्णालय झाल्यास स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, फिजिशियन, शस्त्रक्रियेसाठी २ तज्ज्ञ व वैद्यकीय अधिकारी २ अशा ७ तज्ज्ञ डॉक्टरांसह ४५ विविध कर्मचारी मिळतील. ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याचा योग्य सल्ला व चांगल्या शस्त्रक्रिया होतील. रुग्णांची मोठ्या शहरांकडे जाण्याची होणारी धावपळ थांबेल.
-------------------
*
उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयासाठी जागेची उपलब्धता
उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयासाठी लागणारी ४२०० चौरस मीटर क्षेत्राची जागा आजरा ग्रामीण रुग्णालयाशेजारी उपलब्ध आहे. त्या ठिकाणी सुसज्ज व अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले रुग्णालय उभे राहू शकते. रुग्णालयाचा प्रस्ताव मंत्रालयात निधीच्या बजेटसाठी गेला आहे. मात्र, त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
------------------------
फोटो ओळी : उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या प्रतीक्षेत असलेले आजऱ्याचे ग्रामीण रुग्णालय.
क्रमांक : २५०५२०२१-गड-०१