कोल्हापूर : शहरामध्ये रविवारी सकाळी महास्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. या अभियानमध्ये केएमसी कॉलेजचे व न्यू कॉलेजचे एन. सी. सी.चे विद्यार्थी, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांनी सहभाग नोंदविला. मोहिमेत खरमातीसह एकूण १३ डंपर कचरा गोळा करण्यात आला.मोहिमेकरिता आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता सुरेश कुलकर्णी, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहिले. सकाळी संप आणि पंप हाऊस येथे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते महास्वच्छता मोहिमेस व वृक्षारोपणास प्रारंभ झाला.
न्यू कॉलेजच्या एन. सी. सी.च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता करून संप आणि पंप हाऊस परिसरात बांबूच्या झाडाचे वृक्षारोपण केले. लक्ष्मीपुरी येथील कोरे हॉस्पिटल पिछाडीस केएमसी कॉलेजच्या एन. सी. सी.च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता करून पुलाशेजारील नाल्याच्या बाजूच्या जागेत बांबूच्या झाडाचे वृक्षारोपण केले, तसेच हुतात्मा पार्क येथे नाल्याशेजारील स्वच्छता करून तेथेही वृक्षारोपण केले. स्वरा फौंडेशनच्या वतीने रिलायन्स मॉलच्या पिछाडीस स्वच्छता करून तेथे झाडाचे वृक्षारोपण केले.मोहिमेत प्रभाग समिती सभापती राजसिंह शेळके, नगरसेवक तौफिक मुल्लानी, सूरमंजिरी लाटकर, स्मिता माने, स्वाती यवलुजे, पर्यावरण तज्ज्ञ सुहास वायंगणकर, न्यू कॉलेजचे एनसीसीचे प्रा. के. डी. तिऊरवाडे, केएमसी कॉलेज व न्यू कॉलेजच्या एन. सी. सी.च्या ६० चे विद्यार्थी, उदय गायकवाड, दिलीप देसाई, अजय कोराणे, माजी नगरसेवक राजेश लाटकर, मारुती माने, वैभव माने, सागर यवलुजे, टाकाळा येथील कल्पवृक्ष प्रेमी ग्रुप, स्पोर्टस फौंडेशन इंडियाचे कार्यकर्ते, आर्किटेक्ट असोसिएशनचे सदस्य व महापालिकेच्या सर्व विभागाकडील कर्मचारी, आरोग्य विभागाकडील कर्मचारी, अधिकारी, स्वयंसंस्थेचे कार्यकर्ते व नागरिक यांनी सहभाग नोंदविला.५ डंपर प्लास्टिक कचराशहरात प्लास्टिक हटाव मोहीम सुरू असताना गेली अनेक वर्षे नाल्याच्या कडेला मातीत रुतून बसलेला तसेच नाल्यातून वाहून येऊन तुंबलेला सुमारे ५ डंपर प्लास्टिक कचरा जमा करण्यात आला.येथे राबविली महास्वच्छता मोहीमहॉकी स्टेडियम ते सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल ते लक्ष्मीपुरी, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल मागील बाजूस ते रिलायन्स मॉल पिछाडीस, आयर्विन ब्रिज ते पंप हाऊस, संप आणि पंप हाऊस ते सिद्धार्थनगर सिद्धिविनायक गणपती मंदिर पुलाची खालची बाजू, लक्ष्मीपुरी ते आयर्विन ब्रिज, टायटन शोरूमलगत दफनभूमी, या जयंती नाल्याच्या परिसराची स्वच्छता केली.झोपडपट्टी परिसरात सफाईरविवारपासून झोपडपट्टीतील स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. सदर बाजार विचारेमाळ व राजेंद्रनगर झोपडपट्टी या परिसरातील स्वच्छता करण्यात आली. सदर बाजार, विचारेमाळ, मुक्तसैनिक वसाहत या ठिकाणी नाल्यांची सफाई केली, तर पोलीस लाईनमध्येही स्वच्छता मोहीम राबविली.