कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांवर ३७२ समुदाय आरोग्य अधिकारी हजर झाल्याने आता ग्रामीण जनतेला आणखी चांगल्या आरोग्य सेवा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अधिकाऱ्यांना १३ प्रकारच्या सेवा देणे कोल्हापूर जिल्हा परिषदेने बंधनकारक केले आहे. अजूनही आठ अधिकारी हजर व्हायचे आहेत.
या अधिकाऱ्यांना नेमून दिलेल्या उपकेंद्रांमध्ये सकाळी साडेआठ ते दुपारी एक वाजेपर्यंत बाह्यरुग्ण तपासणी करावी लागणार आहे. अर्ध्या तासाच्या भोजन सुट्टीनंतर त्यांनी दोन ते पावणे पाच या वेळेत कार्यक्षेत्रात भेटी देणे अपेक्षित आहे. संध्याकाळी पावणे पाच ते पाच या वेळेत त्यांनी दिवसभरामध्ये केलेल्या कामाचा अहवाल सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पोर्टलवरून भरावा लागणार आहे. हा अहवाल भरला नाही तर त्याचा परिणाम कार्य मूल्यमापन आणि मानधनावर होणार आहे.
मूळ मानधनाव्यतिरिक्त या १३ प्रकारच्या सेवा नागरिकांना कशा पद्धतीने दिल्या जातात त्यानुसार त्यांचे कार्यमूल्यमापनावर आधारित मानधन अदा करण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रानुसार नेहमीच्या शासकीय सुट्ट्या घेण्याची अधिकाऱ्यांना मुभा राहणार असून, १८० दिवस प्रसूती रजा, ७ किरकोळ रजा आणि ८ वैद्यकीय रजा देण्यात येणार आहेत. आता तालुका पातळीवर या सर्व अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
चौकट
या अधिकाऱ्यांवर ही असेल जबाबदारी
गरोदरपणातील काळजी, प्रसूती, कुटुंबनियोजन, संसर्गजन्य आजार व्यवस्थापन, ज्येष्ठ नागरिकांचे आजार, नेत्र, मूख आरोग्याची प्राथमिक तपासणी, अतितातडीची वैद्यकीय सेवा, मानसिक समुपदेशन, योगप्रशिक्षण अशा सेवा देण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर राहील.
चौकट
औषधांचा पुरवठाही होणार
एकीकडे जिल्हा परिषदेच्या आरोग्य उपकेंद्रांना आरोग्य अधिकारी प्राप्त झाले आहेत. ते हजर झाले आहेत. त्यांनी रोज रुग्णतपासणी करावयाची आहे. त्यामुळे तेथे औषधे उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे या उपकेंद्रांनाही औषध पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य सभापती हंबीरराव पाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.