कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाची लागण झालेल्या २८ नवीन रुग्णांची नोंद झाली; त्यांपैकी १३ रुग्ण हे कोल्हापूर शहरातील आहेत. या वाढत्या संख्येमुळे कोल्हापूर शहरात विशेष काळजी घेण्यासारखी परिस्थिती आहे. सलग तिसऱ्या दिवशी मात्र एकही मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही, ही त्यातील दिलासादायक बाब आहे.
जिल्ह्यात जेव्हापासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, तेव्हापासून कोल्हापूर शहरातील जास्त रुग्ण असल्याचे दिसत आहे. आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे १९२ प्राप्त अहवालापैकी १५९ अहवाल निगेटिव्ह तर १३ अहवाल पॉझिटिव्ह (२० अहवाल नाकारण्यात आले). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे १२० प्राप्त अहवालापैकी ९८ अहवाल निगेटिव्ह (२२ अहवाल नाकारण्यात आले).
खासगी रुग्णालये/लॅब मध्ये २६७ प्राप्त अहवालापैकी २५२ निगेटिव्ह तर १५ पॉझीटिव्ह असे एकुण २८ अहवाल पॉझीटिव्ह आहेत. जिल्ह्यातील एकुण ५० हजार ५८१ पॉझीटिव्ह रूग्णांपैकी ४८ हजार ४५५ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण १ हजार ७४५ जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या ३८१ इतकी आहे.
हातकणंगले, आजरा, भुदरगड, गडहिंग्लज, करवीर तालुक्यांत प्रत्येकी दोन तर पन्हाळा तालुक्यात एका रुग्णाची नोंद झाली आहे. नगरपालिका क्षेत्रातील दोन रुग्णांसह अन्य जिल्ह्यांतून दोन रुग्ण उपचारांसाठी आलेले आहेत.