सांगरुळ : सांगरुळ येथे मंगळवारी आरोग्य विभागाच्या वतीने ॲन्टिजन तपासण्या घेण्यात आल्या. ८४ नागरिकांच्या तपासण्यामध्ये १३ जण पॉझिटिव्ह आल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील मोठ्या गावात व जिथे कोरोना रुग्ण संख्या अधिक आहे, तिथे ॲन्टिजन तपासण्या करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मंगळवारी सांगरुळ येथे ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने ॲन्टिजन तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये व्यापारी व कोरोना संसर्ग झालेल्या लोकांच्या संपर्कातील ८४ लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १३ जण पॉझिटिव्ह आढळले.
त्यांना गावातील कोरोना केंद्रात दाखल केला आहे. अचानक तपासण्या सुरु केल्याने गावात एकच खळबळ उडाली. त्यातही तेरा जण पॉझिटिव्ह आल्याने गावात भितीचे वातावरण पसरले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी. घुणकीकर, डाॅ. सागर सासने, डाॅ. शीतल पाटील, डाॅ. स्नेहल पाटील, प्रगती पाटील, स्नेहल बनेप, प्रतिमा कांबळे यांच्यासह सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.