कोल्हापूर : महाराष्ट्र, गोवा राज्यातील पोस्टमन, मेलगार्डपदांच्या रिक्त ७०० जागांसाठी कोल्हापूर जिल्ह्यांतील सुमारे १३ हजार जणांनी रविवारी परीक्षा दिली. सुटी असून शहरातील १४ परीक्षा केंद्रे गर्दीने फुलून गेली.महाराष्ट्र राज्य डाक कार्यालयातर्फे सरळ भरती अंतर्गत परीक्षा घेण्यात आली. शहरातील शहाजी कॉलेज, न्यू कॉलेज, देशभूषण हायस्कूल, मगदूम हायस्कूल, महावीर महाविद्यालय, नागोजीराव पाटणकर हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, विवेकानंद कॉलेज, एस. एम. लोहिया ज्युनिअर कॉलेज, केआयटी अशा १४ केंद्रांवर परीक्षा झाली. दुपारी दोन ते चार वेळेत पेपर झाला. सामान्यज्ञान, गणित, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषा विषयांवरील वस्तुनिष्ठ बहुपर्यायी शंभर प्रश्न पेपरमध्ये होते. पेपर हे ‘ए’, ‘बी’, ‘सी’ आणि ‘डी’ असे सेट करण्यात आले होते. त्यातील बहुतांश प्रश्न दहावीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असल्याचे काही उमेदवारांनी सांगितले. दरम्यान, पेपरसाठी दुपारी एक वाजल्यापासून परीक्षा केंद्रांवर उमेदवार येऊ लागले. काहीवेळातच केंद्र गर्दीने फुलून गेले. केआयटी येथील केंद्रासाठी केएमटीने चार जादा बसेसची व्यवस्था केली होती. भारतीय डाक विभागाने नेमलेल्या एका खासगी संस्थेकडून ही परीक्षा घेण्यात आली. कोल्हापूर डाक विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परीक्षा, व्यवस्थापनाचे काम केले. दि. ४ एप्रिलला मल्टी टासकिंग स्फाट (एमटीएस) पदासाठी परीक्षा होणार आहे. (प्रतिनिधी)एक बेंच, दोन उमेदवारया परीक्षेवेळी काही केंद्रांमध्ये एकाच बेंचवर दोन उमेदवारांना बसविण्यात आले होते. त्याबाबत पेपर सुटल्यानंतर अनेक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली. यावर परीक्षेचे नियोजन करणाऱ्या यंत्रणेने उमेदवार असे एकाच बेंचवर बसविले असले, तरी त्यांच्या पेपरचे स्वरूप वेगवेगळे असल्याचे स्पष्ट केले.
१३ हजार जणांनी दिली ‘पोस्टमन’ची परीक्षा
By admin | Published: March 29, 2015 11:48 PM