सतीश पाटील
शिरोली : कागल-सातारा या राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणात वाहतूक आणि स्थानिक प्रवाशांच्या सोयीसाठी अपघाताचे स्पॉट बनलेल्या ठिकाणी १७ मोठे भुयारी मार्ग आणि ०७ लहान भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहेत. यामुळे वारंवार होणाऱ्या अपघाताला आळा बसणार आहे. कागल ते सातारा या १३२ किलोमीटर अंतरावर अनेक मोठी गावे, मोठी शहरे आहेत. या मार्गावर अनेक मोठे अपघात स्पाॅट असल्याने अपघाताला आळा घालण्यासाठी भुयारी मार्गांची गरज होती. कराड, मलकापूर, पेठनाका, शिरोली एमआयडीसी, नागाव फाटा, तावडे हाॅटेल, अंबप फाटा, येलूर फाटा येथे पादचारी आणि प्रवासी महामार्गावरूनच ये-जा करतात. त्यामुळे महामार्गावरील भरधाव वाहनांची धडक बसून अनेक पादचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. महामार्गावर अनेक वाहनधारक विरुद्ध दिशेने प्रवास करतात. त्यामुळे हा जीवघेणा प्रवास टाळण्यासाठी २५ मीटरचे १७ मोठे भुयारी मार्ग उभारले जाणार आहेत, तर १२ हिटलरचे ०७ लहान भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहेत.
मोठे भुयारी मार्ग :- निढोरी जंक्शन, कागल, कागल बसस्टँड, कणेरीवाडी (जाजल पेट्रोल पंप), नागाव फाटा, अंबप, कणेगाव, येलूर, वाघवाडी, नेर्ले, तासवडे, पंढरपूर जंक्शन, इंडोली फाटा, जामगाव, अतीत, नागठाणे.
छोटे भुयारी मार्ग :- कणेरीवाडी, मंगरायाचीवाडी, शिवपुरी, केदारवाडी, जखीनवडी, कासेगाव, माजगाव फाटा.
चौकट : शिरोलीकरांना ठेंगाच
शिरोलीत रोज हजारो विद्यार्थी जीव धोक्यात घालून दररोज महामार्ग ओलांडतात. त्यामुळे ग्रामपंचायतीने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर भुयारी मार्ग करण्याची मागणी २०१८ मध्ये राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यावेळी भुयारी मार्ग मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते; पण प्रत्यक्षात आलेल्या आराखड्यात शिरोलीत भुयारी मार्गाचा समावेश नाही. सहापदरीकरण झाल्यावर विद्यार्थी महामार्ग ओलांडणार कसे, असा सवाल उपस्थित होत आहे.
कोट : सांगली फाटा येथे उड्डाणपूल उभा करणे गरजेचे होते. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग आणि नागपूर-कोल्हापूर राज्य मार्गाला जोडणारा हा मुख्य चौक आहे. ज्योतीराम पोर्लेकर-सामाजिक कार्यकर्ते.
कोट : मंगरायाचीवाडी आणि अंबप फाटा येथे उड्डाण पूल उभारणे गरजेचे होते. या ठिकाणी भुयारी मार्ग मंजूर केल्याने स्थानिक वाहतूक, शेतकरी यांना फायदा होईल. बाळकृष्ण जाधव -पेठवडगाव शेतकरी.