भारत चव्हाण ।कोल्हापूर : मातीचा परंतु एकमेकांना आधार देणारा तीन कप्पी बंधारा, पाणी संचय होण्यासाठी पुरेशी खोली असलेली जागा, पाण्याचा नैसर्गिक निचरा होण्यासाठी असलेला सांडवा, प्रदूषण होणार नाही याची घेण्यात आलेली विशेष काळजी आणि अशा नियोजनबद्ध कामांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून अर्ध्या अधिक शहराची तहान भागविणारा कळंबा तलाव अलीकडील काळात खचत असल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या १३४ वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या तलावाच्या मजबुतीकरणाकरिता कोणतीही विशेष खबरदारी घेण्यात आलेली नाही.कळंबा तलावाच्या मुख्य बंधाºयाला प्रमुख आधार देण्यासाठी अन्य दोन उपबंधारे बांधण्यात आलेले आहेत. त्यातील दोन उपबंधारे अगदी मजबूत आहेत; परंतु मुख्य बंधाºयाचा वरचा भाग गेल्या काही वर्षापासून खचू लागला आहे. संस्थानकाळात करण्यात आलेले पिचिंग पाण्याच्या दाबाने नामशेष झाले आहे. त्यानंतर करण्यात आलेले दगडी पिचिंंग कोसळले आहे.
अलीकडेच दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारच्या निधीतून हाती घेण्यात आलेल्या १० कोटींच्या कामातून नव्याने दगडी पिचिंग करण्यात आले, तेही अवघ्या काही महिन्यांतच कोसळले आहे. बंधाºयाला पाण्याच्या बाजूने दिलेला दगडाचा अस्तर पूर्णत: खचला आहे. त्यामुळे ठेकेदाराने केलेल्या कामाचा दर्जा संशयाच्या भोवºयात सापडला आहे.
कळंबा तलाव हा १३४ वर्षांपूर्वी म्हणजे १ जुलै १८८३ रोजी बांधून पूर्ण करण्यात आला. त्यामुळे सध्या असणार बंधारा पाण्याचा भार पेलण्याकरिता किती सक्षम व मजबूत आहे याचे तज्ज्ञ अभियंत्यांमार्फत तांत्रिक लेखापरीक्षण होणे अत्यावश्यक असून, त्यानुसार त्याची देखभाल-दुरुस्ती होणे गरजेचे आहे. सध्यातरी तलावाचा बंधारा निमुळता होत असून, खचलेला आणि भविष्यकाळातील धोक्याचा इशारा देत आहे.
महानगरपालिका प्रशासन, महाराष्टÑ जीवन प्राधिकरण, राज्य सरकार यांच्याकडून तलावाकडे दुर्लक्ष झाले असून याही पुढे असेच दुर्लक्ष झाले तर मात्र एक दिवस ऐन पावसाळ्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता जाणकारांतून व्यक्त केली जाते. कारण या तलावाच्या खाली संपूर्ण कळंबा गाव असून पुढे शहराची लोकवस्ती आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांना वेळीच खबरदारी घेणे आवश्यक आहे.वरिष्ठांचेही दुर्लक्ष ....कळंबा तलावाच्या सुशोभीकरणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दहा कोटींचा निधी मंजूर केला. त्यापैकी ७ कोटी ७५ लाख रुपये उपलब्ध झाले. अद्याप यातील ४५ लाख रुपये खर्च व्हायचे आहेत. त्यामुळे एवढ्या कमी किमतीत दगडी पिचिंग होणे अशक्य आहे. सध्या खर्च झालेला निधी आणि झालेले काम याचा ताळमेळ बसत असल्याचे वरकरणी दिसत नाही. झालेल्या खर्चाचे लेखापरीक्षण होणे आवश्यक असले तरी महानगरपालिका लेखापरीक्षक हे कार्यालयात बसून कागदपत्रांच्या आधारे लेखापरीक्षण करतात असा अनुभव आहे. अशीच थेट पाईपलाईन योजनेतील एका पुलास पंचवीस लाख रुपये खर्च आला असताना अडीच कोटींच्या बिलास मंजुरी दिली होती.कळंबा तलावाच्या दक्षिणेला काही शेतकºयांनी अतिक्रमण करून ऊस, भात, भुईमूग शेती केली आहे. मागे १ लाख ४५ हजार रुपये भरून महानगरपालिकेने तलावची हद्द निश्चित करून घेतली. प्रत्यक्षात मात्र अशा प्रकारची अतिक्रमणे काढली गेली नाहीत.तलावाचा इतिहास असा...कळंबा तलावाची जागा मेजर ई. स्मिथ यांनी पाहून निश्चित केली.इंजिनियर आर. जे. शेनॉन यांनी तलावाचा आराखडा तयार केला.शेनॉन यांनी ओव्हरसियर रघुनाथ रामचंद्र शिरगावकर यांच्या मदतीने तलाव बांधला.तलावाचे काम २१ मार्च १८८१ -१ जुलै १८८३ या काळात झाले.चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकीर्दीत कागल संस्थानाधिपती जयसिंगराव आबासाहेब कार्यभार पाहत असताना काम पूर्ण झाले.पोलिटिकल एजंट - डब्लू. सी. पार व एच. एन. रिव्हज् होते.