लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून कोल्हापूर जिल्ह्यात १,३५३ कोटींची कामे करण्याचा निर्धार जिल्हा परिषदेने केला आहे. या रकमेच्या १ लाख ५४ हजार ३६२ कामांना बुधवारी स्थायी समितीमध्ये मान्यता देण्यात आली. त्यातून ३ लाख ५१ हजार मनुष्य दिवस निर्माण होणार आहेत.
महाविकास आघाडी सरकारने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक निधी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव आणि रोहया कृषी अधिकारी विश्वास कुराडे यांनी यासाठी युद्धपातळीवर नियोजन केले आहे. एकूण आराखड्याच्या ६० टक्के खर्च हा कृषी आधारित कामांवर होणे बंधनकारक करण्यात आले आहे. या कामांच्या माध्यमातून ग्रामस्थांना रोजगार निर्माण झाला पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. हा आराखडा तयार करताना तालुका स्तरावर गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.
चौकट
ही कामे करता येणार
वृक्ष लागवड, नवीन विहिरी खोदणे, जनावरांसाठी गोठा, किमान १०० पक्ष्यांची पोल्ट्री शेड, नॅडेप, गांडूळ खत प्रकल्प, शोषखड्डा, शाळा, अंगणवाडी बांधकामे, वैयक्तिक, सामूहिक शौचालये, रस्त्यांचे मुरुमीकरण, खडीकरण, खेळांची मैदाने, रोपवाटिका, घरकुल, शाळांना संरक्षक भिंत, छतासह बाजारओटे, शालेय स्वयंपाकगृह निवारा, पेव्हिंग ब्लॉक, ग्रामपंचायत भवन, शासकीय इमारतींवरील रेनवॉटर हार्वेस्टिंग, स्मशानभूमी शेड, रेशीम लागवड ही कामे या योजनेतून करता येणार आहेत. शासनाच्या सर्व विभागांच्या सहकार्यातून ही कामे करणे बंधनकारक आहे.
कोट
या योजनेच्या माध्यमातून अनेक कामे जिल्ह्यांमध्ये करता येणे शक्य आहे. सर्वसाधारण सभेमध्ये हा आराखडा मंजूर झाल्यानंतर तातडीने गावोगावी विकासकामे सुरू होतील.
- अमन मित्तल
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर