समीर देशपांडे / कोल्हापूर : मातांना पहिल्या प्रसुतीवेळी पाच हजार रुपयांचे अनुदान देणाऱ्या ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजनें’तर्गत गेल्या १७ महिन्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील २८ हजार मातांच्या खात्यांमध्ये १४ कोटी ५९ लाख २९ रुपयांचे अनुदान जमा झाले आहे. कोरोना कालावधीमध्ये मिळालेले हे अनुदान या महिलांसाठी दिलासा देणारे ठरले आहे.
महाराष्ट्रात ही योजना दि. १ जानेवारी २०१८पासून लागू करण्यात आली. ज्यामध्ये १ जानेवारी २०१७पासून प्रसुती झालेल्या मातांचा समावेश करण्यात आला होता. घरामध्ये होणारी प्रसुती रुग्णालयात व्हावी, गरोदर महिलेचे आरोग्य नीट राहावे आणि बाळाचे लसीकरण नियमित व्हावे, अशी शासनाची अपेक्षा असून, त्यासाठीच ही योजना सुरू करण्यात आली.
डिसेंबर २०१७पासून प्रत्यक्षात कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेचे काम सुरू झाले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गावोगावी असलेल्या यंत्रणेच्या बळावर अतिशय कमी कालावधीत पात्र ५० हजारांहून अधिक महिलांची नोंदणी करून घेतली. गेल्यावर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि अनेकांच्या उत्पन्नावर मर्यादा आल्या. व्यवसाय बंद पडले. रोजगार बंद ठेवावा लागला. अशा परिस्थितीत सर्वसामान्य कुटुंबातील गरोदर महिलांसाठी हे अनुदान दिलासादायक ठरले.
चौकट
निती आयोगाने घेतली होती दखल
महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्याने चांगले काम करत अल्पावधीत हजारो गरोदर मातांची नोंदणी करत त्यांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान मिळवून दिले. याची दखल केंद्र सरकारच्या निती आयोगाने घेतली. या आयोगाचे दोन सल्लागार सदस्य कोल्हापूर जिल्ह्यात येऊन गेले. त्यांनी आरोग्य विभागातील कोणालाही बरोबर न घेता, त्यांनीच आणलेल्या मराठी दुभाषकाला सोबत घेऊन जिल्ह्यातील काही गावांमध्ये जाऊन परस्पर छाननी केली आहे.
चौकट
तीन टप्प्यांत मिळतात पैसे...
१. गरोदर मातांनी शासकीय रुग्णालयात नोंद केल्यानंतर : एक हजार रुपये.
२. आधारकार्ड, बँकेच्या खात्याची माहिती दिल्यानंतर १८० दिवसांनंतर : दोन हजार रुपये.
३. प्रसुतीनंतर बाळाचे लसीकरण पूर्ण झाल्यावर : दोन हजार रुपये.
चौकट
सतरा महिन्यात मिळालेले अनुदान
ग्रामीण भागात : १० कोटी ३४ लाख रूपये
नगरपालिका क्षेत्र : २ कोटी ६ लाख रूपये
महानगरपालिका क्षेत्र : २ कोटी १८ लाख रूपये
०९०६२०२१-कोल-मातृवंदना लोगो