कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने कोल्हापूर शहरात सुरू असलेल्या आंबा महोत्सवाला कमालीचा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत कोल्हापूकरांनी तब्बल ४ हजार डझन आंबे फस्त केले असून १४ लाखांची उलाढाल झाली आहे. ‘देवगड’ हापूसला सर्वाधिक पसंती राहिली आहे.पणन मंडळाच्या वतीने दरवर्षी आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाते, यंदा लोकसभा निवडणुकीमुळे महोत्सवाला थोडा उशीर झाल्याने प्रतिसाद कसा मिळतो? याबाबत साशंकता होती. मात्र, महोत्सवातील आंब्यांचे प्रकार व खात्रीमुळे कोल्हापूरकरांच्या आंबा खरेदीसाठी अक्षरश: उड्या पडत आहेत. या महोत्सवात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सोलापूरसह कोल्हापुरातील २८ शेतकरी सहभागी झाले आहेत. ‘रत्नागिरी हापूस’सह विविध वाणांचे आंबे उपलब्ध असले तरी तुलनेत देवगड हापूसला मागणी अधिक आहे. आतापर्यंत ५०० डझन देवगड आंब्याची विक्री झाली आहे.राजारामपुरीत आंब्याचा सुगंधराजारामपुरी येथील भारत हाउसिंग सोसायटी हॉलमध्ये महोत्सव सुरू असून अस्सल कोकणी आंब्याचा सुगंध परिसरात दरवळत आहे. त्यामुळे गेली दोन दिवस रात्री उशिरापर्यंत गर्दी पहावयास मिळत असून १७ हजार ग्राहकांनी भेट दिली आहे.
आंबा महोत्सवात खात्रीशीर व इतरांच्या तुलनेत कमी दरात आंबा मिळत असल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. गुरुवार (दि. २३) पर्यंत महोत्सव राहणार असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा. - डॉ. सुभाष घुले (उपसरव्यवस्थापक, पणन मंडळ, कोल्हापूर)