भीमगोंडा देसाईकोल्हापूर : शहर विकास आराखड्यात आरक्षित शहरातील मोक्याच्या ठिकाणचे १४ वाहन तळांच्या जागा नकाशात जितक्या आहेत तितक्या सध्या न राहता त्या गायब झाल्या आहेत. त्यावर प्रचंड अतिक्रमण झाले आहे. याकडे महापालिका वर्षानुवर्षे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे.यामुळे क्रीडाईने शेवटी गुगल मॅपद्वारे आरक्षित जागांचा शोध घेऊन महापालिकेस अहवाल दिला आहे. या सर्व जागांचा विकास झाल्यास शहरातील पार्किंगची समस्या कमी होणार आहे.
कोल्हापूर शहराचा दुसरा सुधारित विकास आराखडा सन १९९९ मध्ये करण्यात आला. या आराखड्याची अंमलबजावणी २००० सालापासून सुरुवात झाली. या विकास आराखड्यात शहरातील १४ जागा वाहनतळांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या. पण या सर्व जागा विकसित करण्यात महापालिकेस अपयश आले. सध्या काही ठिकाणच्या जागा विकसित केले जात आहे.बहुतांशी जागांतील वाहनतळ कागदावरच राहिले आहे. यामुळे आरक्षित जागांच्या चारही बाजूने प्रचंड गतीने अतिक्रमण वाढते आहे. अनेक वाहनतळाच्या प्रत्यक्षातील जागा शोधूनही सापडत नाहीत. यामुळे सन १९९९ सालच्या विकास आराखड्याच्या नकाशाच्या आधारे गुगलवरून आरक्षित १४ जागांचा शोध क्रीडाईने नुकताचा घेतला आहे. त्याचा विकास करण्यासाठी ते पाठपुरावा करीत आहे.
वाहनतळासाठी आरक्षित जागा व त्याचे क्षेत्र स्वेअर मीटरमध्येशाहू उद्यान १५०० , ताराबाई रोड ८००, रंकाळा टॉवर ५०००, अंबाबाई मंदिर १०००, उमा टाॅकीज ९००, रिलायन्स मॉल ७४००, लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे ४००, महाराणा प्रताप चौक १६०, मराठा बोर्डीगजवळ ११९००, गोकूळ हॉटेलजवळ ४००, व्हिनस कॉर्नर ९१००, हुतात्मा पार्क १६००, कोटीतीर्थ तलाव २१००, तावडे हॉटेल ९१८००.
विकास आराखड्यातील आरक्षित १४ वाहनतळांच्या जागा क्रीडाईने गुगल मॅपद्वारे शोधून काढले आहे. यातील अनेक जागांवर अतिक्रमण झाले आहे. सर्व आरक्षित जागांचा विकास करून वाहनतळ केल्यास बाहेरून येणाऱ्या पर्यटकांवर वाहन पार्किंगसाठी जागेचा शोध घेण्याची वेळ येणार नाही. - विद्यानंद बेडेकर, अध्यक्ष, क्रिडाई
शहरात वाहनतळासाठी आरक्षित केलेल्या जागा महापालिकेच्या ताब्यातच आहेत. तिथे वाहनतळ म्हणून विकसित करण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. काही ठिकाणी वाहनतळांचा आराखडाही तयार केला आहे. - नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता, महापालिका