कोल्हापूर : ब्लॅक ॲरा आणि डॉक्सी फायनान्स कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून कंपनीतील १४ जणांनी गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार जानेवारी २०२२ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत घडला. याबाबत मतीन आप्पासाब सनदी (वय ३८, रा. रमणमळा, कोल्हापूर) यांनी सोमवारी (दि. २४) शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी १४ संशयितांवर गुन्हा दाखल केला.
समीरखान देसाई, अमीरखान देसाई (दोघे रा. रुईकर कॉलनी, कोल्हापूर), अमोल विलासराव मोहिरे (रा. लक्षतीर्थ वसाहत), फिरोज मुलतानी (रा. सूरत, गुजरात), नितीन जगतियानी, रियाज पटेल, आय. डी. पटेल, जहांगीर खान (पूर्ण नाव, पत्ते उपलब्ध नाहीत), इसाक बागवान (रा. इचलकरंजी), सागर अशोक कांबळे (रा. पाडळी खुर्द, ता. करवीर), रियाज अमीरहमजा मुरसल (वय ४७, रा. उचगाव), आनंदराव प्रकाश घोरपडे (रा. दत्तवाड, ता. शिरोळ), अंजुम लांडगे (रा. सांगली) आणि मोहसीन खुदावंत (रा. इचलकरंजी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
संशयितांनी शाहूपुरी येथे ब्लॅक ॲरा आणि डॉक्सी फायनान्स कंपन्या सुरू करून त्याद्वारे आकर्षक परतावा देण्याचे आमिष फिर्यादी सनदी यांना दाखवले. त्यानुसार सनदी यांनी ब्लॅक ॲरा कंपनीकडे ३ लाख २० हजार, तर डॉक्सी कंपनीकडे १२ लाख ८० हजार रुपये भरले. पैसे भरून काही महिने उलटले तरी परतावा मिळत नसल्याने सनदी यांनी कंपनीच्या पदाधिका-यांकडे चौकशी केली. मात्र, गुंतवलेली रक्कम आणि परतावा याबद्दल पदाधिका-यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी न्यायालयात धाव घेऊन दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशानुुसार शाहूपुरी पोलिसांनी संशयितांवर गुन्हा दाखल केला. कंपनीने कोल्हापूरसह आसपासचे जिल्हे आणि कर्नाटकातील शेकडो गुंतवणूकदारांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा अंदाज फिर्यादींनी वर्तवला आहे. त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.