उचगाव: करवीर तालुक्यातील नेर्ली-तामगावात वन्यप्राण्याच्या हल्ल्यात १४ मेंढ्या ठार तर ४ मेंढ्या जखमी झाल्या. यात मेंढपाळाचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना काल, गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली.नेर्ली-तामगावच्या उत्तरेला शंकर पाटील यांची शेती आहे. पाच दिवसापूर्वी खतासाठी पंडित कलाप्पा धनगर, धुळा शिवांप्पा धनगर, या दोघा मेंढपाळाच्या ४५० मेंढ्या -बकऱ्या शेतात बसविल्या होत्या. गुरुवारी रात्रीच्या सुमारास दोरखंडाच्या जाळीतून अचानक वन्यप्राण्याने मेंढ्यावर हल्ला चढविला. यात १४ मेंढ्या जागीच ठार झाल्या तर ४ मेंढ्या जखमी झाल्या.जखमी मेढ्यावर सांगवडेचे पशुधन अधिकारी डॉ. प्रमोद लोखंडे, प्रकाश नाईक, उपचारक सुरेश कोळी परीचर यांनी उपचार केले. तर करवीर वनविभागाचे अधिकारी आर. एस. कांबळे, वनपाल विजय पाटील, तलाठी दिपाली कुंभार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
मेंढ्यांवर हल्ला करणाऱ्या प्राण्याचे नेमके वर्णन सांगता येत नाही. सभोवती फिरून प्राण्याच्या पायाचे ठसे घेतले आहेत. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नेमके कारण समजू शकणार आहे. - आर.एस.कांबळे, वनविभाग अधिकारीअचानक झालेल्या हल्यात मेंढ्या व कोकर दगावलीत. शासनाने आम्हास नुकसान भरपाई द्यावी. -पंडित धनगर, धुळा धनगर - मेंढ्यांचे मालक