कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या यंत्रणेच्या माध्यमातून आतापर्यंत १४० कोरोना रूग्णांची आणि १८ हजार जनावरे स्थलांतरित करण्यात आली आहेत अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली.
जिल्हा परिषदेतून सध्या पूर काळाचे व्यवस्थापन सुरू असून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखाराव यांच्या उपस्थितीमध्ये चव्हाण हे देखील या नियोजनामध्ये पूर्ण वेळ सहभागी आहेत. चव्हाण म्हणाले, पुरामुळे जिल्ह्यातील २९३ गावे बाधित झाली असून १ लाख नागरिक यामुळे बाधित झाले आहेत. यातील ४५ हजार नागरिकांची नातेवाईकांकडे सोय झाली असून उर्वरित सर्वांची २०० शासकीय निवारा गृहांमध्ये सोय करण्यात आली आहे.
दोन वर्षांपूर्वीच्या महापुराची तुलना करताना चव्हाण म्हणाले, २०१९ साली जेव्हा महापूर आला तेव्हा कोरोना नव्हता. मात्र यावेळी सर्व काही करताना कोरोना प्रतिबंधक काळजी घेऊनच सर्व काही करावे लागते. हे करूनच १४० कोरोना रूग्णांना स्थलांतर करून योग्य ठिकाणी दाखल करण्यात आले आहे. तसेच हायरिस्क नागरिकांची ॲंटिजन चाचणीही करण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या विभागांनी गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर काय जबाबदारी पार पाडायचे आहे याबाबतही सूचना करण्यात आल्या असून प्रत्येक तालुक्याला संपर्क अधिकारी नेमण्यात आले असून त्यांच्याकडून तेथील दैनंदिन परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.